अनैतिक संबंधातून अमोल भवरेचा खून

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): ऑटोचालकाच्या मृत्यू प्रकरणाने अखेर यू-टर्न घेतला असून मृतकाच्या पत्नीच्या  फिर्यादीवरून या प्रकरणात दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी अखेर खुनाचा तसेच पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. नव्हेतर या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आल्याने “हिंदवार्ता”ने  वर्तवलेला अंदाज पूर्णपणे खरा ठरला आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा खून झाल्याची चर्चा असून खुनाचे नेमके कारण पोलीस तपासातून समोर येणारच आहे.
धरणगाव (ता.मलकापूर) येथील ऑटोचालक अमोल भाऊराव भवरे (वय ३५ वर्षे) याचा मृतदेह दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत संशयास्पद स्थितीत मिळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. मृतकाच्या गळ्यावर असलेले दोरीने फाशी दिल्याचे व्रण,तोंडातून झालेला रक्तस्राव आणि त्याचा एक हात फ्रॅक्चर असल्याने त्याची हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकून दिल्याचा अंदाज “हिंदवार्ता” ने वर्तवला होता. मात्र, मृतकाच्या कुटुंबीयांनी कोणावरच संशय नसल्याचे सांगितल्याने पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात मर्ग दाखल केला.
दरम्यान, अमोलची पत्नी शितल अमोल भवरे (वय ३२ वर्षे) यांनी आपल्या पतीचा खून करण्यात आल्याची फिर्याद दिली. नव्हेतर ७ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ७.३५ वाजता आरोपी दिनेश तायडे याने मोबाइलवरून अमोल भवरे यांना फोन केला होता. तसेच फोनवर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर अमोल भवरे हे “दिनेशचा फोन आला आहे, मी शेताकडे जातो” असे सांगून स्वतःची ऑटोरिक्षा घेऊन रागाच्या भरात घरातून निघून गेले. मात्र, ते त्या रात्री घरी परतले नाहीत. दरम्यान, ८ जानेवारी रोजी सकाळी शिवनी–तालसवाडा रोडवर अमोलचा मृतदेह आढळून आल्याची फिर्याद दिली.
या प्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय संहिताचे कलम १०३(१), २३८(ब) अन्वये खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांनी तपासचक्रे फिरवीत गोपनीय खबरे तसेच तांत्रिक माहिती काढली. नव्हेतर आरोपी दिनेश तायडे याला बेड्या ठोकल्या असून या प्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!