अमडापूर : पोलिसांनी विद्यार्थ्यांना गिरवले “रस्ता सुरक्षा”चे धडे!

बुलढाणा,(प्रतिनिधी): जिल्ह्यातील रस्त्यांवर वाढती अपघात संख्या पाहता रस्ते वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती आवश्यक आहे. याच हेतूने अमडापूर पोलिसांनी ठाणेदार निखिल निर्मल यांच्या नेतृत्वात विशेष मोहीम राबवत पेठ येथील ज्ञानेश्वर विद्यालयात रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती केली. तसेच विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन करण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यात १ ते २६ जानेवारी या कालावधीत “रस्ता सुरक्षा अभियान” राबवण्यात येत आहे. शालेय स्तरापासूनच भविष्यातील चालकांना शिस्त आणि नियमांची माहिती करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानांतर्गत अमडापूर ठाणेदार निखिल निर्मल व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केलेली आहे.
पोलीस अंमलदार सुरडकर, गजानन काकडे यांनी विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे महत्त्व सविस्तरपणे पटवून दिले. १८ वर्षांखालील मुला-मुलींनी कोणत्याही परिस्थितीत वाहन चालवू नये, हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून जीवघेणे ठरू शकते, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही वैध चालक परवाना असल्याशिवाय वाहन चालवू नये, अशी समज विद्यार्थ्यांना दिली. तसेच दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्यावर भर देत अपघाताच्या वेळी डोक्याला होणारी गंभीर दुखापत टाळण्यासाठी हेल्मेट वापरा, वाहन चालवताना आरसी बुक, इन्शुरन्स आणि लायसन्स सारखी आवश्यक कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा, यासह अन्य मार्गदर्शन केले.
ठाणेदार निर्मल यांचे कौतुक
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात मडापूर ठाणेदार निखिल निर्मल स्वतः पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या प्रत्येक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागृती होत असून त्यांच्यात उत्साह पाहायला मिळत आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!