“आऊट ऑफ कंट्रोल”! बुलढाण्यात लाडक्या बहिणींचा संताप !

बुलढाणा,(प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाने मोठ्या थाटामाटात सुरू केलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंमलबजावणीतील त्रुटींमुळे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. अशाच काही तांत्रिक कारणांमुळे जिल्ह्यातील तब्बल ३० हजार महिलांचा लाभ रखडल्याने संतप्त झालेल्या खामगावच्या महिलांनी चक्क रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तब्बल तासभर प्रशासनाला महिलांनी धावणार धरल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात महिलांमध्ये मोठा उत्साह होता. हाताचे कामे सोडून,तर कोणी मजूर बुडवून हजारो महिलांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. केवायसी अपडेट करून आधार लिंकिंगची प्रक्रियाही पूर्ण केली. मात्र, तरीही जिल्ह्यातील ३० हजारांवर महिलांच्या खात्यात अद्यापही लाभाचे पैसे जमा झाले नाही. बँक खाते लिंक नाही, अर्ज त्रुटींमध्ये अडकल्याची करणे देऊन प्रशासन या महिलांची बोळवण करत असल्याने सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही पैसे का येत नाहीत?, असा सवाल या महिलांनी उपस्थित करत ओबीसी महासंघाचे गणेश चौकशे यांच्या नेतृत्वात खामगावच्या हजारो महिलांनी आज २० जानेवारी रोजी प्रतिज्ञापत्र आणि तक्रार अर्ज सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
जिल्हाधिकारी आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तांत्रिक कारणांमुळे लाभ थांबलेल्या महिलांचा शोध घेऊन त्यांच्या त्रुटी दूर करण्यात याव्यात, रखडलेले सर्व हप्ते तत्काळ महिलांच्या खात्यात जमा करण्यात यावेत, अर्जातील त्रुटी महिलांना समजेल अशा भाषेत समजून सांगावी, महिलांना कार्यालयाचे उंबरठे झिजवायला लावू नये, अशी मागणी करण्यात आली असून महिनाभरात सर्व अडथळे दूर करून लाभ सुरळीत न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देखील ओबीसी महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका महिन्यात तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिल्याने महिलांनी सदर आंदोलन मागे घेतले. अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची मात्र चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसून आले. प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत, तर बुलढाणा जिल्ह्यात लाडक्या बहिणींचा मोठा उद्रेक पाहयला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको, हे विशेष!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!