अमरावती,(प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी देखील पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक घट्ट करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोबतच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी पक्षाचे अधिकृत ‘ए.बी.’ फॉर्म वाटप करण्याची जबाबदारी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या १५ संपर्कप्रमुखांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाने जाहीर केलेल्या अधिकृत पत्रानुसार राज्यभरात विविध जिल्ह्यांसाठी संपर्क प्रमुखांची नेमणूक करण्यात आली असून यामध्ये प्रामुख्याने प्रवीण हेंडवे (गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ), गजानन लोखंडकर (बीड, जालना), संतोष किटुकले (अमरावती, वाशिम) आणि नितीन आगे (अकोला, बुलढाणा) यांचा समावेश असून त्यांच्याकडे सोपवलेल्या जिल्ह्यांमध्ये उमेदवारी अर्जांचे वाटप आणि स्थानिक पातळीवरील अडचणी सोडवण्याचे संपूर्ण अधिकार देखील देण्यात आले आहेत. तर इतर महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये संजय देशमुख (नागपूर विभाग), अमोल जगदाळे (धाराशिव, सोलापूर), अमित ठाकूर (लातूर, नांदेड) आणि गौरव जाधव (सातारा, सांगली, कोल्हापूर) यांचा समावेश असून, मुंबई व उपनगराची धुरा ॲड. स्वप्नील पाटील आणि ॲड. अजय तापकीर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. जिल्हा संपर्क प्रमुखांनी स्थानिक जिल्हा प्रमुखांना विश्वासात घेऊन निवडणुकीचे काटेकोर नियोजन करावे,असे स्पष्ट निर्देशही बच्चू कडू यांनी दिले आहेत.
२५ जानेवारीपर्यंत सादर करावा लागणार
नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व संपर्क प्रमुखांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नियोजनाचा सविस्तर अहवाल येत्या २५ जानेवारी २०२६ पर्यंत पक्ष कार्यालयाकडे सादर करावा लागणार आहे. यावरून प्रहार जनशक्ती पक्ष या निवडणुकीत अत्यंत गांभीर्याने आणि नियोजित पद्धतीने उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे.
पक्षाची भूमिका पारदर्शक
प्रहार जनशक्ती पक्ष नेहमीच शेतकरी, कष्टकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नावर आक्रमक राहिला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सत्तेत वाटा वाढवण्यासाठी पक्षाने जोरदार व्यूहरचना आखली असून ‘ए.बी.’ फॉर्म वाटपाची जबाबदारी थेट विश्वासू पदाधिकाऱ्यांकडे सोपवून कडू यांनी पक्षात शिस्त आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.