आता…अब तक छप्पन नहीं, सिर्फ पचपण!

शेगाव,(प्रतिनिधी): राज्य परिवहन महामंडळाची बस म्हणजे ग्रामीण नागरिकांसाठी वरदानच आहे. ५५ प्रवाशांची क्षमता असलेल्या एसटी बसेसमध्ये ९० ते १०० प्रवाशांची वाहतूक करून त्यांना नियोजितस्थळी पोहोचवल्या जाते. मात्र, असे असतांनाही नागरिकांकडून चालक आणि वाहकांविरुद्ध खोट्या तक्रारींचा पाऊस पाडल्या जातो. या त्रासाला कंटाळून शेगाव आगारातील चालक आणि वाहकांनी आज २१ जानेवारी रोजी अनोखे आंदोलन केले. सर्व काही नियमानुसारच करणार असल्याचा इशारा देत, बसमध्ये आता ५५ च्या वर एकही प्रवासी न घेण्याचा निर्णय घेतला. नव्हेतर अनेक बसफेऱ्यांमधून जास्तीच्या प्रवाशांना उतरवून देण्यात आले. या आंदोलनामुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली.
शेगाव एसटी आगारामध्ये राज्यभरातील प्रवासी “श्रीं”च्या दर्शनासाठी येतात. मात्र, या आगारात आधीच एसटी बसेसची कमतरता आहे. असे असले तरी येथील एसटी आगाराचे उत्पन्न बऱ्यापैकी आहे. दरम्यान शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये विद्यार्थ्यांकरिता एसटी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, शेवटच्या स्टॉपपर्यंतचे विद्यार्थी आणि प्रवासी बसमध्ये चढत असताना अनेक प्रवासी व विद्यार्थी खालीच राहतात, अशा तक्रारी विद्यार्थी व प्रवासी नेहमीच वरिष्ठांकडे करतात. वरिष्ठ अधिकारी कुठलीही शहानिशा न करता चालक-वाहकांना जाब विचारतात. यामुळे त्रस्त होऊन आज बुधवारी चालक, वाहकांनी शेगाव बसस्थानकात अनोखे आंदोलन करून केले. आजपासून ५५ प्रवाशांपेक्षा एकही अधिकारी प्रवासी एसटी बसमध्ये जास्तीचा घेणार नसल्याचा पवित्रा घेण्यात आला.
शेगाव ते जळगाव व शेगाव ते पातुर्डा या बसमधून जास्त झालेल्या प्रवाशांना चक्क खाली उतरवून देण्यात आले. यावेळी शेगाव आगारातील कर्मचारी महेश बुरुंगले, जमीर देशमुख, अतुल वसत्कार, नरेंद्र खंडेराव, भास्कर गीते, शेषराव निंबाळकर, विशाल इंगळे, नरेंद्र खंडेराव, दीपक वरोकार, सतीश धनभर, विजय पवार, गोपाल गुजर, योगेश मंडोकार, ज्ञानेश्वर डिक्कर, रूपाली ताथोड, उज्वला शिरसाट उपस्थित होते.
नवीन बसेस देण्यातही भेदभाव
एसटी महामंडळाकडून बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश आगारांना प्रत्येकी दहा नवीन बसेस देण्यात आल्या. यामध्ये शेगाव आगाराला बसेसची जास्त आवश्यकता असतानासुद्धा फक्त आठ बसेस देण्यात आल्या. आगारातील नवीन शिवशाही बसेस या मलकापूर आगाराला पाठवण्यात आल्या. जिल्हाभरातील नादुरुस्त असलेल्या जुन्या भंगार शिवशाही बसेस या शेगाव आगाराला देण्यात आल्या. ज्या बसेस आजही आगारामध्ये भंगार अवस्थेत उभ्या आहेत. त्यामुळे संत नगरीच्या एसटी आगाराशी असा भेदभाव का? असा प्रश्न चालक, वाहक विचारीत आहेत.
पुरेपूर सेवा देत असतानाही तक्रारी
एसटी बसची प्रवासी क्षमता ही ५० आसनस्थ आणि ५ प्रवासी उभे असे एकूण ५५ प्रवाशांची क्षमता असताना सुद्धा कुठलाही प्रवासी किंवा विद्यार्थी आपल्या घरापर्यंत सुरक्षित आणि वेळेवर पोहोचावा, यासाठी शेगाव आगारात चालक-वाहक क्षमतेपेक्षा दुप्पट म्हणजे शंभरपर्यंत प्रवासी असलेली बस खचाखच भरून नेतात. असे असतानाही प्रवासी नेत नसल्याच्या खोट्या तक्रारी होत असतील तर आता नियमानुसारच प्रवासी वाहतूक करावी लागेल व तास निर्णय आता घेण्यात आला आहे. शासनाने यासाठी शेगाव आगारात एसटी बसेसची संख्या वाढवून द्यावी, असे वाहक महेश बुरुंगले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!