उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी साश्रू नयनांनी वाहिली विदीप जाधवांना श्रद्धांजली

फलटण,(प्रतिनिधी): राजकारणातील नाती आणि कर्तव्ये पार पाडत असताना, काही भेटी काळजाला घर पाडणाऱ्या असतात, याचा प्रत्यय नुकताच आला. राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज २ फेब्रुवारी रोजी फलटण तालुक्यातील तरडगाव येथे भेट राज्याचे दिवंगत लोकप्रिय नेते स्व.अजितदादा पवार यांच्यासोबत झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले त्यांचे अंगरक्षक कै. विदीप जाधव यांच्या निवासस्थानी जात त्यांनी जाधव कुटुंबाचे सांत्वन केले.
 
स्व.अजितदादा पवार यांच्या सावलीसारखे सोबत असणारे विदीप जाधव यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपली निष्ठा जपली. त्यांच्या जाण्याने जाधव कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराची जाणीव ठेवून, सुनेत्रा वहिनींनी आज त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्या डोळ्यांत आपल्या निष्ठावंत सहकाऱ्याप्रती असलेल्या कृतज्ञतेचे भाव स्पष्ट दिसत होते. केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्या घरातील वृद्ध, महिला आणि मुलांशी संवाद साधत त्यांनी जाधव कुटुंबाचे सांत्वन केले. “आम्ही तुमच्या दुःखात पूर्णपणे सहभागी आहोत आणि या कठीण काळात आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” अशा शब्दांत त्यांनी जाधव कुटुंबियांना धीर दिला. यावेळी परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या या भेटीमुळे जाधव कुटुंबाच्या डोळ्यांत पुन्हा एकदा अश्रू तरळले, मात्र पवारांनी दिलेल्या आधारामुळे त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!