“औरंगजेबाची कबर उखडून फेका अन् तिथे मूत्रालय बांधा!” टी. राजासिंह यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी) : “औरंगजेबाची कबर म्हणजे हिंदूंच्या छातीवर ठोकलेला खिळा आहे. जोपर्यंत ही कबर उखडून फेकली जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, इतिहास लिहिण्याची हीच वेळ आहे. जेसीबी लावा आणि ती कबर उखडून तिथे मूत्रालय बांधा,” अशा अत्यंत आक्रमक शब्दांत श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते टी. राजासिंह ठाकूर यांनी रणशिंग फुंकले.
पिसादेवी येथील द्रौपदाबाई नानाभाऊ काळे क्रीडा संकुलात आज १९ मार्च रोजी पार पडलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धर्मप्रचारक सदगुरू नंदकुमार जाधव आणि हिंदू जनजागृती समितीच्या प्रियांका लोणे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना टी. राजासिंह यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘देवाभाऊ’ असा करत ” देवाभाऊ तुम्ही ही कबर उखडून टाका, महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदू तुम्हाला मरेपर्यंत विजयी करेल,असे आव्हान केले. आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले, त्याची कबर महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत असूच शकत नाही. तुमची मुलगी कोणत्याही वयाची असो, तिला शत्रू आणि मित्र यातला फरक सांगा, असे आवाहनही त्यांनी यावेळी महिलांना केले. लव्ह जिहादसाठी परदेशातून फंडिंग होत असल्याचा खळबळजनक आरोप करत त्यांनी सर्वांना ‘केरळ स्टोरी २’ पाहण्याचा सल्ला दिला.
इम्तियाज जलील यांच्यावर टीका
एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर तोफ डागत राजासिंह म्हणाले की, “हिंदूंच्या विभाजनामुळेच जलील यांच्यासारख्यांची ‘बदला घेण्याची’ हिंमत वाढली आहे. आपण जातीपातीत विखुरलो गेलो म्हणूनच मालेगाव आणि संभाजीनगरमध्ये ओवेसींचा पक्ष फोफावला.” देशात तातडीने ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ लागू करण्याची गरज असून सदर कायदा मोदींनी लागू करण्याची मागणी त्यांनी केली. “आमचे दोन तर त्यांचेही दोनच असावेत. दोनपेक्षा जास्त मुले असल्यास त्यांना सरकारी योजनांपासून वंचित ठेवा आणि १ लाख रुपये दंड लावा,” असे ते म्हणाले.
धर्मांतर विरोधी कायद्याचे स्वागत पण…
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणलेल्या ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयका’चे त्यांनी स्वागत केले. मात्र, केवळ कायदा करून चालणार नाही, तर त्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष ‘टास्क फोर्स’ नेमावा आणि ज्या जिल्ह्यात धर्मांतर होईल, तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला थेट निलंबित करावे, अशी आक्रमक मागणीही त्यांनी लावून धरली. यावेळी “जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है!”, या घोषणेने संपूर्ण क्रीडा संकुल दणाणून गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!