कर्जमुक्तीच्या आठवणीसाठी बच्चू कडूंचा २५० किमीचा एल्गार!

अमरावती,(प्रतिनिधी): शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने रस्त्यावर उतरणारे आंदोलन सम्राट, लोकनेते माजी आ. बच्चू कडू आता पुन्हा एकदा रणांगणात उतरले आहेत. मेळघाटातील आदिवासी बांधवांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या रखडलेल्या ‘कर्जमुक्तीची आठवण’ करून देण्यासाठी बच्चू कडू यांनी २५० किलोमीटरची ऐतिहासिक ‘महापदयात्रा’ पुकारली असून, येत्या ९ मार्च २०२६ रोजी चिखलदऱ्यात महामोर्चाचा धडाका उडणार आहे. या आंदोलनामुळे मेळघाटातील राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

विकासापासून दूर असलेल्या मेळघाटासाठी ‘न्याय हक्काची लढाई’
स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटली तरी मेळघाटातील दुर्गम भाग आजही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. येथील आदिवासी बांधव, भूमिहीन मजूर आणि शोषित घटकांच्या पिढ्यान्‌पिढ्या अन्यायात जात आहेत. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी ही ‘मेळघाट संघर्ष यात्रा’ काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनांची आठवण करून देणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे.
२५० किमीची पायी पायपीट
ही केवळ पदयात्रा नसून तो व्यवस्थेविरुद्ध पुकारलेला एल्गार आहे. सलोना ते चिखलदरा अशा विविध मार्गांनी ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे. हतरू, जारिदा, काटकुंभ, सलोना, खडीमल, सेमाडोह आणि रायपूर यांसारख्या दुर्गम भागातून ही मशाल चिखलदऱ्यापर्यंत पोहोचणार आहे. पायथ्यापासून ते गडापर्यंत होणारी ही २५० किलोमीटरची पायी पायपीट सरकारला धडकी भरवणारी ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
‘प्रत्येक गावातून एक गाडी’
शेतकऱ्यांचे आक्रमक नियोजन
शेतकरी नेते महेंद्र भांडारकर यांनी या आंदोलनासाठी आक्रमक आवाहन केले आहे. “आता आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे! गप्प बसून प्रश्न सुटणार नाहीत, तर रणांगणात उतरावे लागेल,” असे म्हणत त्यांनी प्रत्येक गावातून किमान एक गाडी भरून आंदोलकांनी सलोना येथे पोहोचण्याचे आवाहन केले आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
शेतकरी कर्जमुक्तीची पूर्णतः अंमलबजावणी करणे, मेळघाटातील आदिवासींच्या न्याय हक्कांचे संरक्षण, दुर्गम भागातील रस्ते, आरोग्य आणि शिक्षण सुविधांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे, भूमिहीन मजुरांना रोजगाराची हमी देणे यासह अन्य मागण्यांसाठी ही पदयात्रा निघणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!