अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा बुद्रुक येथे उघडकीस आली आहे. केवळ किरकोळ कारणावरून एका ८ वर्षांच्या निष्पाप बालकाला बाथरूममध्ये कोंडून ठेवण्याचा अमानवीय प्रकार घडला. बालकाच्या आईने याचा जाब विचारला, तेव्हा तीन महिला आरोपींनी मिळून तिला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि बेदम मारहाण केली. या प्रकरणी तामगाव पोलिसांत भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काकणवाडा येथील रहिवासी असलेल्या माया वाकोडे (वय २७ वर्षे) या शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. १८ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्या शेतातील काम आटोपून घरी परतल्या. तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांचा ८ वर्षांचा मुलगा भावेश हा रडत होता आणि त्याला आरोपींनी घराच्या बाथरूममध्ये कोंडून ठेवले होते. एका लहान मुलाला अशा प्रकारे कोंडून ठेवल्याचे पाहून मातेचे हृदय हेलावले. माया वाकोडे यांनी “माझ्या मुलाला बाथरूममध्ये का कोंडले?”, असा जाब आरोपींना विचारला असता, त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी कायद्याची भीती न बाळगता न्याय मागण्यासाठी गेलेल्या माया वाकोडे यांना आरोपी कांचन राजधन सोनोने, नंदणी अजय सोनोने आणि इंदुबाई लक्ष्मण सोनोने यांनी घेरले. त्यांना अश्लील शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. “तुला जिवंत सोडणार नाही,” अशी जीवे मारण्याची धमकी देखील दिली. एका कष्टकरी महिलेवर भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीडित महिलेने या प्रकरणी तामगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार संतोष गाडे हे करीत आहेत. लहान मुलांना लक्ष्य करणे आणि महिलांवर हात उचलणे ही विकृती आहे. काकनवाडा येथील या घटनेने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे. कष्टकरी महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि अशा प्रवृत्तीच्या महिला आरोपींना कठोर धडा शिकवण्यासाठी पोलीस आता काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.