चिखली,(प्रतिनिधी) : चिखली तालुक्यातील काठोडा येथील एक २१ वर्षीय तरुणी संशयास्पद रित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निकिता माधव गिरी असे या तरुणीचे नाव असून, ती १७ मार्च २०२६ च्या दुपारपासून बेपत्ता आहे. या प्रकरणी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
काठोडा येथील रहिवासी संदीप माधव गिरी यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, निकिता ही १७ मार्च रोजी दुपारी १.३० च्या सुमारास घरी एकटीच होती. यावेळी तिने शेजारी राहणाऱ्या ज्योती हिवरकर यांना “मी माझ्या गावातील मैत्रिणीकडे चालले आहे” असे सांगितले आणि ती घरून बाहेर पडली. मात्र, रात्र उलटूनही निकिता घरी परतली नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मैत्रिणींकडे चौकशी केली, परंतु तिचा कोणताही पत्ता लागला नाही.
शेवटी हताश झालेल्या कुटुंबीयांनी अंढेरा पोलीस स्टेशन गाठून या प्रकरणाची रीतसर तक्रार दिली. निकिता माधव गिरीची उंची ५ फूट २ इंच, रंग गोरा, केस काळे, बांधा सडपातळ असून तिने अंगात काळया रंगाचा टॉप आणि लेगीज, पायात भुरकट रंगाची सँडल घातलेली आहे.
अंढेरा पोलिसांनी याप्रकरणी मिसिंग दाखल केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार भरत जगन्नाथ पोफळे हे करत आहेत.