खळबळजनक: “त्या” बेपत्ता इसमाची हनुमान मंदिराच्या सभामंडपात आत्महत्या

अजय टप 
मलकापूर,(प्रतिनिधी): विदर्भाचे प्रवेशद्वार असलेले मलकापूर येथून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वडनेर भोलजी येथील हनुमान मंदिरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे  परिसरात एकच खळबळ उडाली.
मलकापूर शहरातील रहिवासी असलेले गजानन माधवराव ताडे (वय ५० वर्षे) हे गेल्या १५ फेब्रुवारी २०२६ पासून बेपत्ता होते. या प्रकरणी त्यांचे भाऊ विष्णू माधवराव ताडे यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली होती. नातेवाईक त्यांचा सर्वत्र शोध घेत असतानाच १९ फेब्रुवारी रोजी सकाळी वडनेर भोलजी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराच्या सभा मंडपात एका व्यक्तीने गळफास घेतल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळ पंचनामा केला. सदर मृतदेह बेपत्ता असलेल्या गजानन ताडे यांचाच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.
वडनेर भोलजी पोलीस चौकीचे पोलीस अंमलदार प्रमोद राठोड यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार प्रमोद चिखलकर हे करीत आहेत. गजानन यांनी आत्महत्या का केली?, याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!