अभिनय बोर्डे
धाड,(प्रतिनिधी) : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील एका सराफा दुकानदाराला धाड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जनुना शिवारात अडवून, चार अज्ञात इसमांनी कोयत्याचा धाक दाखवत तब्बल साडेसात लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि मोबाइल लंपास केला. ५ मार्च रोजी सकाळी घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून गुन्हेगारांचे वाढलेले धाडस आणि भरदिवसा घडणाऱ्या लुटमारीच्या घटनांनी व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वालसावंगी (ता.भोकरदन जि. जालना) येथील रहिवासी असलेले राजू सखाराम बाविस्कर हे सराफा व्यवसायात आहेत. परिसरातील आठवडी बाजारांमध्ये फिरून ते सोन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्री करतात. आज, ५ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकी वाहनाने वालसावंगी येथून गुम्मी येथील आठवडी बाजारासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने होते. जनुना मार्गे गुम्मीकडे जात असताना, जनुना शिवारात एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग केला आणि बाविस्कर यांचे वाहन अडवले. या कारमधून उतरलेल्या चार पैकी दोन अज्ञात हल्लेखोरांनी खाली उतरताच बाविस्कर यांना घेरले. काही समजण्यापूर्वीच एकाने कोयत्याचा धाक दाखवून त्यांना जागीच खिळवून ठेवले. “ओरडाल तर याद राखा,” अशी धमकी देत या लुटारूंनी बाविस्कर यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने असलेली बॅग आणि त्यांचा मोबाइल फोन हिसकावून घेतला. अवघ्या काही मिनिटांत हा लुटमारीचा खेळ संपवून आरोपी आपल्या वाहनासह वाऱ्याच्या वेगाने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांनी आपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनीही आपल्या पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. तसेच तपासाची चक्रे फिरवीत आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे.
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत धाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची विशेष पथके विविध दिशांना रवाना करण्यात आली आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेने पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. पांढऱ्या रंगाची ती ‘कार’ कोणाची आणि हे आरोपी बाविस्कर यांच्या मार्गावर पाळत ठेवून होते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.