खळबळजनक: समृद्धी महामार्गावर परप्रांतीय तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

किनगाव राजा, (प्रतिनिधी): गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे भाग्य बदलणाऱ्या ‘समृद्धी महामार्गावर’ गुन्हेगारांचा नंगा नाच सुरू आहे. लुटमार, अवैध धंदे, डिझेल चोरी, असे एक ना अनेक प्रकार घडत असतानाच आता अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या परप्रांतीय ट्रक चालकाच्या भावावर एका अज्ञात इसमाने प्राणघातक हल्ला करून त्याला मरणासन्न अवस्थेत सोडून दिल्याची धक्कादायक घटना नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३२२ वर घडली. या घटनेने परिसरात आणि महामार्गावरील प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
बिहार राज्यातील समस्तीपूर येथील रहिवासी असलेला सबलू कुमार राय हा तरुण समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होता. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. हा हल्ला केवळ लुटमारीच्या उद्देशाने होता, की यामागे काही जुने वैमनस्य आहे, याचे गूढ अद्याप उकलेले नाही. मात्र, हल्ल्याचे स्वरूप पाहता हल्लेखोरांच्या डोक्यात क्रूरतेचे भूत स्वार होते हे यातून स्पष्ट दिसून येत आहे.
हल्लेखोरांनी सबलू कुमार राय याला जीवे मारण्याच्या उद्देशाने अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. हल्लेखोरांनी केवळ डोक्यावर आणि पायावरच नव्हे, तर गुप्तांगावरही गंभीर वार केले आहेत. या अमानुष कृत्यामुळे सबलू हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सध्या तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून, गेल्या सहा दिवसांपासून तो बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याच्या या अवस्थेमुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
घटनेनंतर तब्बल पाच दिवसांनी, म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी फिर्यादी राजाराम राय (रा. बिहार) यांनी दिलेल्या तक्रारीवरून किनगाव राजा पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन गिते हे करीत आहेत.
समृद्धीवर गुन्हेगार मोकाट?
समृद्धी महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांची गस्त असल्याचा दावा केला जातो. मग पहाटेच्या सुमारास इतकी मोठी घटना घडतेच कशी? अज्ञात आरोपी सबलूला रक्ताच्या थारोळ्यात सोडून पसार होतातच कसे? महामार्गावर ट्रक थांबवणे किंवा तिथे वावरणे आता असुरक्षित झाले आहे का?, असे अनेक तिखट सवाल आता उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!