बुलढाणा,(प्रतिनिधी): रक्षकानेच भक्षक बनावे आणि कायद्याच्या रक्षकावरच हात उचलावा, यापेक्षा दुर्दैवी बाब काय असू शकते? बुलढाणा जिल्ह्याच्या तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कवठळ शेत शिवारात अशाच एका थरारक घटनेने संपूर्ण पोलीस दल हादरून गेले. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला केवळ विचारणा केली म्हणून अमानुष मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, या हल्ल्यातील मुख्य आरोपींपैकी एक स्वतः पोलीस दलात कार्यरत असून, त्याने आपल्याच सहकाऱ्याचे कपाळ फोडून खाकी वर्दीला काळीमा फासण्याचे काम केले आहे.
त्याचे झाले असे की, ५ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री ११.३० वाजेच्या सुमारास तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संतोष तुळशीराम आखरे (वय ५१ वर्षे) आणि प्रमोद मुळे हे शासकीय वाहनाने आपल्या हद्दीत रात्रगस्त घालत होते. याच दरम्यान कवठळ शेत शिवारात काही लोक ‘गुप्तधन’ काढण्यासाठी विधी करत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार पंडितराव सोनवणे यांना मिळाली. या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी आखरे आणि मुळे हे घटनास्थळी पोहोचले. मात्र, तिथे शोध घेतल्यावर असा कोणताही प्रकार आढळून आला नाही.
तपास करून परत येत असताना रस्त्यात त्यांना दोन संशयास्पद व्यक्ती दिसल्या. कर्तव्यभावनेतून आखरे यांनी त्यांना “एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करत आहात?”, असा प्रश्न विचारताच आरोपींचा संताप अनावर झाला. यातील आरोपी राजेश गव्हाळे (वय ४२ वर्षे) आणि त्याचा भाऊ मनोज गव्हाळे (वय ३८ वर्षे) यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. दोन्ही आरोपींनी पोलीस अंमलदार आखरे यांना अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी हातातील स्टीलच्या कड्याने आखरे यांच्या पाठीवर आणि कपाळावर जोरदार वार केले. या हल्ल्यात आखरे यांच्या कपाळाला गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले. साक्षीदार पोलीस अंमलदार मुळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी संतोष आखरे यांच्या तक्रारीवरून तामगाव पोलिसांत उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम १३२, १२१(१), ११८(१), २९६, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार पंडितराव सोनवणे हे करत आहेत.
पोलीस दलाची प्रतिमा मलीन
ज्या पोलीस दलाने जनतेचे रक्षण करायचे, त्याच दलातील एक कर्मचारी जेव्हा दुसऱ्या जिल्ह्याच्या पोलिसावर हल्ला करतो, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत का?, असा प्रश्न उपस्थित होतो. आरोपी मनोज गव्हाळे याला पोलीस नियमावलीची आणि शिस्तीची पूर्ण जाणीव असतानाही त्याने केलेले हे कृत्य केवळ गुन्हा नसून पोलीस विभागाशी केलेली गद्दारी आहे. खाकी वर्दीवर हात टाकणाऱ्या या मुजोर आरोपींना कठोरात कठोर शासन होणार का? अकोला पोलीस दलातील त्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळणार का? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.