खामगाव: सराईत गुन्हेगार रितीक इंगळेवर “एमपीडीए”अंतर्गत कारवाई

बुलढाणा,(प्रतिनिधी): आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका सराईत आणि धोकादायक गुन्हेगारावर ‘महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व हातभट्टीवाले यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम-१९८१ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. रितीक रमेश इंगळे (वय २५ वर्षे), असे या स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

बुलढाणा जिल्ह्यात आगामी काळात गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी यांसारखे महत्त्वाचे सण साजरे होणार आहेत. या उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये, या हेतूने पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमधील गुन्हेगारांच्या अभिलेखांची पडताळणी केली. यामध्ये खामगाव येथील रितीक इंगळे याच्यावर शरीरविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तो समाजासाठी धोकादायक ठरत असल्याने त्याच्याविरुद्ध “एमपीडीए” कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. आज १७ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करत, रितीक इंगळे याला एक वर्षाच्या कालावधीसाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि सुनील अंबुलकर, खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोनि रामकृष्ण पवार, तसेच पोलीस अंमलदार संजय भुजबळ, राकेश नायडू, अरुण हेलोडे, राम धामोळे, विष्णू चव्हाण आणि अमर ठाकूर या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून, सर्वसामान्य नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. जिल्ह्याची शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही इसमाची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!