अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): टाटा मॅजिक गाडीचे थकीत भाडे मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला शिवीगाळ करून चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना खामगाव तालुक्यातील गणेशपूर येथे घडली. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
गणेशपूर येथील रहिवासी असलेले इंद्रजीत बाळकृष्ण वाघे (वय २८ वर्षे) यांच्याकडे टाटा मॅजिक क्रमांक एमएच-२८-आर-३३५७) ही गाडी असून सदर गाडी ते भाड्याने चालवतात. फेब्रुवारी २०२६ मध्ये आरोपी शेषराव उर्फ विक्की गजानन झाटे याच्या नातेवाईकांनी ही गाडी सिल्लोड (जि.जालना) येथे लग्नासाठी ३ हजार रुपये भाड्याने नेली होती. मात्र, लग्नाचे काम आटोपल्यानंतरही गाडीचे भाडे देण्यात आले नव्हते. ९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास इंद्रजीत वाघे हे गावातील गावंडे यांच्या चक्कीजवळ आरोपी शेषराव झाटे याला भेटले व आपल्या हक्काचे ३ हजार रुपये भाडे मागितले. याचा राग येऊन आरोपीने ‘तुला कसले पैसे द्यायचे, काय करायचे ते करून घे’, असे म्हणत अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच ‘पुन्हा पैसे मागितले तर तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन’, अशी धमकीही दिली. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपी शेषराव झाटे, किशोर लठाड, नागेश ढोके आणि दीपक डिगांबर लठाड या चौघांनी इंद्रजीत यांना चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी गावातील नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. जाताना आरोपींनी ‘तुमच्या घरी येऊन मारू’, अशी धमकी दिली.
याप्रकरणी इंद्रजीत बाळकृष्ण वाघे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम २९६, ११५ (२), ३५२, ३५१ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार प्रवीण जाधव हे करीत आहेत.