अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): सध्याच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. माहेरी जाण्यासाठी घरातून निघालेली एक १९ वर्षीय विवाहिता रहस्यमयी रितीने बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील उदयनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी अमडापूर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पोलीस प्रशासनासह नातेवाईकांकडून महिलेचा कसून शोध घेतला जात आहे.
हिवरखेड (ता. चिखली) येथील रहिवासी असलेले फिर्यादी महादेव प्रल्हाद बाराहाते (वय २९ वर्षे) यांची पत्नी अनुराधा महादेव बाराहाते (वय १९ वर्षे) ही १७ मार्च २०२६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उदयनगर येथून “मी माहेरी किन्ही सवडत येथे जाते,” असे सांगून ऑटोने निघाली होती. मात्र, बराच वेळ उलटूनही ती माहेरी पोहोचली नाही. माहेर आणि आजूबाजूच्या नातेवाईकांकडे तिचा शोध घेण्यात आला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही.
या प्रकरणी १८ मार्च रोजी महादेव बाराहाते यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नी हरवल्याची तक्रार दिली. बेपत्ता अनुराधाचे वय १९ वर्षे, रंग गोरा, उंची ५ फूट, बांधा मजबूत असून तिने अंगात गुलाबी रंगाची साडी आणि ब्लाउज, पायात काळ्या रंगाची सँडल घातलेली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मिसिंग दाखल केली असून घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिरसाट हे करत आहेत. बेपत्ता महिलेसंदर्भात काहीही माहिती मिळाल्यास अमडापूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.