चिखली, (प्रतिनिधी) : चिखली नगर परिषदेच्या विकास आराखड्यातील आरक्षण वगळून स्थानिक नागरिकांना घरकुल व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करत छोटू कांबळे यांनी आज २९ मार्च रोजी केंद्रीय आयुष मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार, भूमिपुत्र ना. प्रतापराव जाधव यांना निवेदन सादर केले.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चिखली नगर परिषदेच्या सुधारित मंजूर विकास योजना आराखड्यात शेत सर्व्हे क्रमांक ९८ मधील आरक्षण क्रमांक ७२ व १७ अंतर्गत अनुक्रमे मुलींचे वसतीगृह व शासकीय निवासस्थानासाठी आरक्षण ठेवण्यात आले होते. मात्र, नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या १८ जुलै २०१३ रोजीच्या ठराव क्रमांक तीन नुसार हे आरक्षण वगळण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जागेवरील आरक्षण तात्काळ वगळून त्या ठिकाणी स्थानिक रहिवाशांना घरकुल, रस्ते, नाले व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत चिखली शहरातील रविदास नगर परिसरातील मातंगपुरा, पोलीस लाईनलगत राहणारे नागरिक तसेच एकता नगर येथील रहिवाशांना तातडीने घरकुल बांधून देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. संबंधित भागांमध्ये रस्ते, नाले व इतर मूलभूत सुविधांचीही तातडीने पूर्तता करावी, असेही निवेदनात नमूद आहे.
या वेळी शिवसेना चिखली शहर प्रमुख विलास घोलप, तालुका प्रमुख गजानन मोरे, उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर, विठ्ठलराजे जगदाळे, कैलास भालेकर, राजेश पवार, पवन चिंचोले यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.