चिखलीत वासंतिक नवरात्रौत्सवाची धूम: रेणुकादेवी यात्रेला आजपासून प्रारंभ!

चिखली,(प्रतिनिधी): लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि चिखली नगरीचे ग्रामदैवत श्री रेणुकादेवीच्या वासंतिक नवरात्रौत्सवाला उद्या बुधवार, २५ मार्चपासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. रेणुकादेवी संस्थान आणि बचानंद महाराज संस्थानच्या वतीने यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, २ एप्रिल रोजी होणाऱ्या भव्य वहन मिरवणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२५ मार्च रोजी सकाळी घटस्थापना व उत्सवाचा प्रारंभ होणार असून २६ मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त पटपूजा, गुलाल-पुष्प उधळण आणि हभप राजेंद्र महाराज तळेकर यांचे प्रवचन, २७ मार्च रोजी स्वामीनारायण जयंती व रात्री ८ वाजता ‘ऋणानुबंध’ संस्थेचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम, ३० मार्च रोजी सोमप्रदोषानिमित्त सकाळी ११ ते ४ या वेळेत शिवलीलामृत वाचन, ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ ते १० दरम्यान हभप शिवानीताई शिंदे यांचे कीर्तन आणि १ एप्रिल रोजी हभप राणीताई दौंड (नाशिक) यांचे कीर्तन होणार आहे. १ एप्रिल रोजी विविध पतसंस्था व संघटनांतर्फे पातळ मिरवणूक, तर रात्री मशाल मिरवणूक निघणार असून विविध मित्र मंडळांच्या वतीने भव्य आतिषबाजी व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. ३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आरती मंडळाच्या वतीने महाप्रसादाने सांगता होणार आहे. या सर्व सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष राजाभाऊ खरात, उपाध्यक्ष गोपाल शेटे, विश्‍वस्त पंडितराव देशमुख, सचिन बोंद्रे व सर्व विश्‍वस्त मंडळाने केले आहे.

वहन मिरवणूक आणि चित्तथरारक खेळ

यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार, २ एप्रिल असून, यादिवशी पहाटे देवीला महाअभिषेक व महाआरती होईल. सायंकाळी ७ वाजता भव्य वहन मिरवणूक निघेल. या मिरवणुकीत पंजाबचे प्रसिद्ध ‘दिलेर खालसा पथक’ आपली चित्तथरारक युद्धकला सादर करणार आहे. सोबतच झांज पथक, बँड, लेझिम, टिपरी, संबळ वादन आणि वाघ्या-मुरळी पथकांचा सहभाग असेल. ही मिरवणूक मंदिर प्रदक्षिणेनंतर लोकमान्य टिळक पुतळा, पंचायत समिती, खामगाव चौफुली, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, राजा टॉवर, उदासिन महाराज मठ, पॉवर क्लब, नदीजवळील चौफुली आणि रोकडा हनुमान मंदिर मार्गे पुन्हा मंदिरात पोहोचणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!