चिखली हादरले! जयस्तंभ चौक परिसरात भीषण आग

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी): चिखली शहरातील गजबजलेल्या जयस्तंभ चौक आणि बॉम्बे मार्केट परिसरात आज दुपारी भीषण आगीचे तांडव पाहायला मिळाले. अवघ्या काही मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील ५ ते ६ छोटी-मोठी दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये प्रसिद्ध ‘हांडगे मामा कचोरी सेंटर’सह चपला, मोबाईल रिपेअरिंग आणि फळांच्या दुकानांचा समावेश आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानदारांचे मोठे आर्थिक

चिखली शहरातील जयस्तंभ चौक परिसरातील एका दुकानातून आज रविवार, १५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.५० च्या सुमारास अचानक धूर निघण्यास सुरुवात झाली. दुपारची वेळ असल्याने परिसरात नागरिकांची वर्दळ होती. बघता बघता आगीने भीषण रूप धारण केले आणि शेजारील दुकानांना आपल्या विळख्यात घेतले. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, आकाशात धुराचे लोट दूरवर दिसत होते.

या आगीत शहरातील अत्यंत लोकप्रिय असलेले हांडगे मामा कचोरी सेंटर हे दुकान आगीत पूर्णपणे खाक झाले. या दुकानाच्या रांगेतील फळ विक्रेत्यांच्या गाड्या आणि साहित्याचे मोठे नुकसान झाले. तसेच चपला-बुटांची दुकाने व दुकानातील साठा जळून खाक झाला. सोबतच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या मोबाईल रिपेअरिंग शॉपमधील ग्राहकांचे मोबाईल आणि दुरुस्तीचे साहित्य जळून राख झाले.

आगीची माहिती मिळताच चिखली नगर परिषद अग्निशमन दल, पोलीस विभाग आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेतली. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परिसरातील तरुणांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी मदत केली, ज्यामुळे आग अधिक पसरण्यापासून रोखता आली. आगीची माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती स्थानिक प्रशासकिती अधिकाऱ्यांनी दिली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभाग अधिकृत तपास करत आहेत. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर लागलेल्या या आगीमुळे चिखली शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आमदार श्वेताताई महाले यांची घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. झालेल्या नुकसानीचा आढावा घेताना त्या भावूक झाल्या होत्या. अनेक कुटुंबांच्या कष्टाची कमाई काही क्षणात जळून खाक झाली, हे पाहून मन खूप व्यथित झाले आहे. ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. नुकसानग्रस्त दुकानदारांना शासनाकडून योग्य मदत मिळवून देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच प्रशासनाला पंचनामा करण्याचे निर्देशही दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!