बुलढाणा,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्हा माहिती कार्यालयातील जन माहिती अधिकाऱ्याने माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत कर्तव्यात कसूर केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. अमरावती येथील प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांचा बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणा दिसून आल्याचे स्पष्ट करत संबंधित अधिकाऱ्याला कडक शब्दांत समज देऊन त्यांची चांगली झाडाझडती घेतली आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या हातात असलेले “माहिती अधिकाराचे” शस्त्र बोथट करण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या सरकारी बाबूंचे पितळ आता पुरते उघडे पडले आहे. नव्हेतर प्रभारी माहिती अधिकारी पवन राठोड यांना मिळालेल्या प्रशस्तीपत्राकडेही आता संशयाच्या नजरेने बघितले जात आहे.
कोथळी (ता. मोताळा) येथील रहिवासी असलेले पत्रकार हनीफ खान बिलन खान यांनी २२ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा माहिती कार्यालय (बुलढाणा) यांच्याकडे वर्तमानपत्रांच्या पडताळणी अहवालाबाबत, तसेच नवीन दरपत्रक प्रस्तावाबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. ३० दिवसांची कायदेशीर मुदत उलटूनही सबंधित कार्यालयाने त्यांना कोणतीही माहिती न देता माहिती अधिकार कायद्याच्या कलम ७ (१) चे उघड उल्लंघन केले होते. या प्रकरणी पत्रकार हनीफ खान बिलन खान यांनी विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक तथा प्रथम अपिलीय अधिकारी अनिल अलूरकर यांच्याकडे अपील दाखल केली होती.
या प्रकरणी झालेल्या सुनावणीत जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांचा बेजबाबदारपणा समोर आला असून कार्यालयातील कनिष्ठ कर्मचारी प्रतीक फुलाडी यांनी वरिष्ठांची कोणतीही परवानगी न घेता परस्पर माहिती दिल्याचे धक्कादायक समर्थन समोर आले होते. यावरून माहिती कार्यालयावर माहिती अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचे आणि प्रशासकीय शिस्त रसातळाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
बेजबाबदारपणाचा ठपका?
विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक तथा प्रथम अपिलीय अधिकारी अनिल आलूरकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चांगलाच संताप व्यक्त केला. नव्हेतर जन माहिती अधिकाऱ्याने अर्जावर जबाबदारीने कार्यवाही न करणे, हे त्यांच्या हलगर्जीपणाचे लक्षण असल्याचे आदेशात नमूद करत विहित मुदतीत पूर्ण माहिती न देणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे, तसेच अर्जदाराला १० दिवसांच्या आत सर्व माहिती विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे सक्त फर्मान वजा आदेश दिलेले आहेत.
सुस्त आणि भ्रष्ट यंत्रणेचे दणाणले धाबे
जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांची कामाप्रती गांभीर्य नसल्यामुळे अर्जदार हनीफ खान यांचे समाधान झाले नाही. यापुढे पदाचे कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून नियमानुसार काम करावे, अशा कडक शब्दांत जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांना समज देण्यात आली असून या निकालामुळे माहिती दडवणाऱ्या सुस्त आणि भ्रष्ट यंत्रणेचे धाबे दणाणले आहे.
उल्लेखनीय कार्य नेमकं कोणते?
माहिती उपसंचालकांनी बुलढाणा माहिती अधिकारी कार्यालयाचे जन माहिती अधिकारी पवन राठोड यांच्यावर बेजबाबदार आणि हलगर्जीपणाचा ठपका ठेवला आहे. नव्हेतर विनापरवानगी सुटू उपभोगल्याने त्यांना विनावेतन करून कारवाई करण्याबाबत वरिष्ठांना अहवाल सादर केल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात राठोड यांचा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे. त्यामुळे उल्लेखनीय कार्य नेमके म्हणावे तरी कशाला?, असा यक्ष प्रश्न जिल्हावासियांना पडला आहे.