देऊळगाव राजा,(प्रतिनिधी):तालुक्यातील दगडवाडी येथे १० एप्रिलच्या मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे एका घराला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग विझवण्याच्या प्रयत्नांदरम्यान घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन सात जण जखमी झाले. मात्र, अग्निशामक दलाने वेळेवर घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
दगडवाडी येथील कारभारी दिपाजी नागरे यांच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. शेजारील सौंदा उगलमुगले हे लघुशंकेसाठी बाहेर आले असता त्यांना ही घटना लक्षात आली. त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांना जागे केले व सरपंचांशी संपर्क साधला. पत्रकार गजानन घुगे यांनी लगेच पीआय ब्रह्मगिरी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली व अग्निशामक दलाची मदत मागवली. पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेत अग्निशामक दलाला पाचारण केले. अवघ्या १५ ते २० मिनिटांत अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत गावकऱ्यांनी बाटल्यांमधून पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. दरम्यान, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच घरातील गॅस सिलेंडरचा अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे घरावरील टिन पत्रे व मोठमोठे दगड दूरवर फेकले गेले. मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. मदत करणारे अनेक गावकरी जखमी झाले. काहीजण एकमेकांवर पडले, तर काहींना टिन पत्रे व दगड लागल्याने दुखापत झाली. या दुर्घटनेत आर्यन घुगे याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याला १८ टाके पडले, तर इतर जण किरकोळ जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी हलविण्यात आले.
घटनास्थळी पोलीस व अग्निशामक दलाने तत्परतेने कारवाई करत आग आटोक्यात आणली. परिसरात इतर घरे लागून असल्याने आग वाढली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशामक दलाच्या वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत घरातील धान्य, महत्त्वाची कागदपत्रे, घरगुती साहित्य तसेच छपराचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने आग लागली तेव्हा घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.
या वेळी ठाणेदार ब्रह्मगिरी, अग्निशामक दलाचे चालक मापारी, तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि सौंदा उगलमुगले यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. सदर घटनेत आर्यन शंकर घुगे, सत्यभामा काशीराम उगलमुगले, चंद्रभागा छगन घुगे, गजानन बाजीराव घुगे, शारदा शिवाजी घुगे, शांताबाई कारभारी घुगे, म्हणजे कारभारी घुगे, रंजना संतोष डोईफोडे जखमी झाले आहेत.