अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): दुकान भाड्याने का दिले, या किरकोळ कारणावरून एका २७ वर्षीय विवाहितेस केस धरून चापटा-बुक्यांनी मारहाण करत, जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना दाताळा येथे घडली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दाताळा (ता.मलकापूर) येथील रहिवासी असलेल्या लक्ष्मी राहुल देशमुख (वय २७ वर्षे) आणि आरोपी हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास लक्ष्मी देशमुख या आपल्या घरी असताना, आरोपींनी “तू कोणाला विचारून दुकान भाड्याने दिले?”, असा जाब विचारत वादाला सुरुवात केली.
वादाचे रूपांतर वादावादीत होऊन आरोपी राहुल मुरलीधर देशमुख (रा. दाताळा) आणि वैशाली वीरेंद्र खर्चे (रा. मलकापूर) यांनी लक्ष्मी यांचे केस ओढून त्यांना चापटा-बुक्यांनी बेदम मारहाण केली. केवळ मारहाणीवरच न थांबता, आरोपींनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लील शिवीगाळ केली. “तू येथून निघून जा, नाहीतर तुला जिवाने मारून टाकू,” अशी धमकीही दिली.
या घटनेनंतर लक्ष्मी देशमुख यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आज २ मार्च २०२६ रोजी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ११५ (२), ३५१ (२)(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार बाळू टाकरखेडे हे करीत आहेत. या घटनेमुळे दाताळा परिसरात खळबळ उडाली असून, घरगुती वादातून होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.