अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्हेगारीने आता वैयक्तिक आयुष्यात शिरकाव केला असून, एका विवाहीत महिलेचा मोबाइल हॅक करून तिला अश्लील कृत्य करण्यास भाग पाडल्याचा खळबळजनक प्रकार सोनाळा येथे उघडकीस आला. आरोपीने पीडितेचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला, तसेच तिच्या पतीला व मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार वैशाली (नाव बदलले आहे, वय ३५) या सध्या दर्यापूर (जि. अमरावती) येथे वास्तव्यास आहेत. घटनेची सुरुवात १२ डिसेंबर २०२३ रोजी झाली. आरोपी ऋषीकेश गिरी (वय अंदाजे २७ वर्ष, रा. शिक्षक कॉलनी, सोनाळा) याने फिर्यादीचा मोबाइल बेकायदेशीररीत्या हॅक केला. हॅकिंगच्या माध्यमातून त्याने पीडितेच्या व्हॉट्सअँप आणि ईमेलमधील अत्यंत खाजगी फोटो, मेसेज आणि व्हिडिओ स्वतःच्या ताब्यात घेतले. हे खाजगी साहित्य आपल्याकडे असल्याचे सांगून आरोपीने पीडितेवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. “तू मला खूप आवडतेस, तू माझ्याशी बोलत जा,” अशी मागणी करत त्याने पीडितेवर जबरी केली. जर तिने बोलण्यास नकार दिला तर तिचे फोटो आणि मेसेज संपूर्ण गावात आणि नातेवाईकांमध्ये व्हायरल करून तिची बदनामी करण्याची धमकी त्याने दिली.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिचा प्रत्यक्ष आणि मोबाइलद्वारे वारंवार पाठलाग केला. इतकेच नव्हे तर, त्याने पीडितेच्या पतीला, बहिणीला आणि इतर नातेवाईकांना फोन करून अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली व त्यांना गंभीर धमक्या दिल्या. हा सर्व प्रकार १० मार्च २०२६ च्या रात्रीपर्यंत सुरू होता. अखेर या त्रासाला कंटाळून सोनाळा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १२ मार्च २०२६ रोजी रात्री ९.२८ वाजता आरोपी ऋषीकेश गिरी विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७५(१), ७५(२), ७७, ७८, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३५६(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) २००० च्या कलम ६६(ई), ६७, ६७(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच रात्री १० वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः ठाणेदार या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हा प्रकार सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा आपला मोबाइल कोणाच्याही ताब्यात देऊ नये. जर कोणी अशा प्रकारे ब्लॅकमेल करत असेल, तर घाबरून न जाता तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या घटनेमुळे सोनाळा परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.
व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास केले भाग
आरोपीचा जाच इतक्यावरच थांबला नाही. त्याने पीडितेच्या कौटुंबिक भावनांचा गैरफायदा घेत तिच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. या भीतीपोटी पीडितेने नाईलाजाने त्याच्याशी संपर्क ठेवला. याचा गैरफायदा घेत आरोपीने अनेक वेळा व्हिडिओ कॉलवर पीडितेला तिचे कपडे काढण्यास भाग पाडले. अत्यंत विकृत मानसिकतेतून त्याने या व्हिडिओ कॉलचे चोरून ‘स्क्रीन रेकॉर्डिंग’ केले आणि ते व्हिडिओ पुन्हा पीडितेसह तिच्या बहिणीला पाठवून तिला मानसिक उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.