धाड नगरीत २५ वर्षांनंतर घुमला देवीचा हुंकार!

तरुणांच्या जिद्दीने सोंगाची परंपरा पुनरुज्जीवित; भक्तीचा महापूर आणि अंगावर शहारे आणणारा सोहळा

धाड, (प्रतिनिधी): चैत्र महिना म्हटला की, मातीच्या गंधासोबतच गावकुसाबाहेर घुमणारा ढोल-ताशांचा आवाज आणि आदिशक्तीच्या जागरणाचे वेध लागतात. ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीत ‘सोंग’ काढण्याची परंपरा ही केवळ करमणूक नसून, तो एक दैवी साक्षात्कार मानला जातो. गेल्या पंचवीस वर्षांपासून धाड गावात ही परंपरा काळाच्या पडद्याआड गेली होती. मात्र, यंदा ७ एप्रिल रोजी धाडच्या मातीने एक नवा इतिहास लिहिला. सुभाष मोहिते, गजानन जाधव, सागर जट्टे, गणेश बोराडे, सुरेश नेमाडे, भिकाजी केळोदे, दिनकर गुजर, अमोल जट्टे, सोनू वाघ आणि निलेश जट्टे या तरुणांच्या अदम्य उत्साहातून २५ वर्षांचा वनवास संपला आणि देवीचे सोंग पुन्हा एकदा धाडच्या गल्लीबोळातून थाटात मिरवले गेले.

कोणतीही परंपरा बंद पडते तेव्हा केवळ सण थांबत नाही, तर गावाची अस्मिता कुठेतरी हरवते. धाडमध्ये हीच रुखरुख अनेक ज्येष्ठांच्या मनात होती. तब्बल अडीच दशकांनंतर जेव्हा देवीच्या सोंगाचे आगमन झाले, तेव्हा संपूर्ण गाव भावूक झाले होते. या परंपरेला पुनरुज्जीवित करण्यासाठी सुभाष मोहिते, गजानन जाधव आणि निलेश जट्टे या त्रयीने गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. जुन्या जाणत्यांकडून सोंगाची पद्धत, त्यामागची शिस्त आणि श्रद्धा समजून घेत त्यांनी हा विडा उचलला. निलेश जट्टे यांनी साकारलेले देवीचे सोंग आणि भिकाजी केळोदे यांनी साकारलेला दैत्य सर्वांचे आकर्षण ठरले. सोंगाच्या अंगाला लावलेला शेंदूर, डोळ्यांत उतरलेली एक अलौकिक चमक, हातात शस्त्र आणि चेहऱ्यावरचा तो रौद्र तरीही वात्सल्यपूर्ण भाव पाहून उपस्थित भाविकांच्या अंगावर शहारे आले. नव्हेतर साक्षात आदिशक्तीचे रूप गावात अवतरल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली होती. डफड्यांच्या कडकडाटात, ‘मर्दडी माता की जय… आंबा भवानी की जय…सप्तशृंगी माता की जय…’च्या जयघोषात हे सोंग जेव्हा मार्गस्थ झाले, तेव्हा प्रत्येक घरासमोर सुवासिनींनी औक्षण करण्यासाठी गर्दी केली होती. सरोदे गल्ली, कुंभार गल्ली, हनुमान मंदिर, धर्मजागृती चौक, सराफा गल्ली, मारवाडी गल्ली मार्गे मिरवणूक पुन्हा भोईगल्लीत पोहचल्यानंतर सांगता करण्यात आली.

संपूर्ण गावातून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत धाडचे जनजीवन भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. तरुण रक्ताने आपल्या पूर्वजांची परंपरा पुन्हा सुरू केल्याचे समाधान गावातील वृद्धांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होते. अनेक घरांसमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तर काहींनी सोंगावर पुष्पवृष्टी केली. सोंगाचा तो डौल, आणि देवीचा जयघोष यामुळे वातावरणात एक वेगळीच ऊर्जा संचारली होती.

धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

ग्रामीण भागात चैत्र नवमीला सोंग काढण्यामागे मोठी धार्मिक पार्श्वभूमी आहे. सोंग काढणे म्हणजे गावाची दृष्ट काढणे, संकटांपासून रक्षण करणे आणि येणाऱ्या वर्षासाठी देवीचा आशीर्वाद घेणे, अशी श्रद्धा आहे. ही परंपरा खंडित झाल्यामुळे गावाला काहीतरी उणे वाटत होते. मात्र, आधुनिकतेच्या युगातही आपल्या मुळांशी जोडले राहण्याचा प्रयत्न या तरुणांनी केला आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे.

तरुणाईचा आदर्श: परंपरेचा नवा प्रकाश

आजची तरुणाई पाश्चात्य संस्कृतीच्या मागे धावत असल्याची ओरड होत असताना, धाडच्या या तरुणांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. गजानन जाधव, सुभाष मोहिते आणि निलेश जट्टे यांनी दाखवलेले हे धाडस केवळ एका दिवसाच्या उत्सवापुरते मर्यादित नाही, तर ते एका संस्कृतीच्या रक्षणाचे पाऊल आहे. या सोहळ्यामुळे धाड गावात पुन्हा एकदा एकीचे दर्शन घडले. जात, धर्म आणि पंथ विसरून संपूर्ण गाव या देवीच्या सोंगामागे उभे होते. २५ वर्षांनंतरचा हा सोहळा केवळ एक मिरवणूक नसून तो धाडच्या अस्मितेचा पुनर्जन्म ठरला. परंपरा जेव्हा तरुणांच्या हाती सुरक्षित असते, तेव्हा संस्कृती कधीच लोप पावत नाही, हेच या सोहळ्याने सिद्ध केले. अंगावर शहारे आणणाऱ्या या देवीच्या सोंगाने धाड नगरीला खऱ्या अर्थाने चैतन्य प्राप्त करून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!