धामणगावमध्ये प्रगटदिन सोहळा उत्साहात

उमेश भालके

धामणगाव धाड,(प्रतिनिधी): विदर्भाची पढंरी आणि शेगावचे संत म्हणुन ओळखले जाणारे संत गजानन महाराज यांचा आज ८ फेब्रुवारी रोजी १४८ वा प्रगटदिन सोहळा धामणगाव धाड येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

महाराष्ट्रातच नाही, तर देश विदेशातील भाविकांकडूनही मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करण्यात येतो. त्याच धर्तीवर धामणगाव धाड (ता.बुलढाणा) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिनाचे औचित्य साधून संध्याकाळी भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी संत गजानन महाराज यांच्या नियोजित जागेवर दुपारी ‘श्रीं’ची महाआरती करण्यात आली. त्यावनंतर संपुर्ण गावातून वाजत गाजत संत गजानन महारांजांच्या पालखीची मिरवणुक काढण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी आपआपल्या घरासमोर लांबलचक, अशा सुशोभित अशा रांगोळ्या काढल्या. त्यामुळे संपुर्ण गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. त्यातच टाळ-मृदंगाच्या निनादात आणि ‘गण गण गणात बोते’, ‘श्री गजानन महाराज की जय’, या जयघोषाने आसमंत दुमदूमून गेला होता. ‘श्रीं’च्या पालखीची मिरवणुकीत गावातील शेकडो महिला-पुरूष, लहान मुले तसेच सर्वच भजनी मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील हे वातावरण पाहून साक्षात विदर्भ पंढरी, संतनगरी शेगाव येथे अवतरल्याचा भास होत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!