नांदुरा: तक्रारकर्त्यास पोलीस उपनिरीक्षकाकडून बेदम मारहाण!

अजय टप
नांदुरा,(प्रतिनिधी): रक्षणकर्तेच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा सामान्य जनतेने न्याय मागावा तरी कोणाकडे ?, असा प्रश्न उपस्थित होतो. असाच काहीसा प्रकार नांदुरा शहरात समोर आला आहे. नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे बुलढाणा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
नांदुरा शहरातील रहिवासी असलेली नालट नामक व्यक्ती काही तक्रार देण्यासाठी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक घाटोळ आणि तक्रारदार नालट यांच्यात कुठल्यातरी कारणांवरून शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर पुढे टोकाला जाऊन पोलीस उपनिरीक्षक घाटोळ यांचा संयम सुटला आणि त्यांनी तक्रारदाराला पोलीस स्टेशनच्या आवारातच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सुरू असलेल्या मारहाणीच्या प्रसंगाचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी परत तक्रारदाराला व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यापासून मज्जाव केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पोलिसांचे आक्रमक रूप स्पष्टपणे दिसून येत असले तरी “हिंदवार्ता” या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
या घटनेनंतर तक्रारदार नालट यांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली असून पोलिसांनी संबंधित व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे परिस्थिती हाताळताना हा प्रकार घडल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोन्ही बाजू ऐकून घेत व्हिडिओमधील तथ्यांची पडताळणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे नांदुरा पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला असून दोषी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!