नांदुऱ्यात उपलेटा ऑटोमोबाईलमागे अनोळखी व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): येथील उपलेटा ऑटोमोबाईल दुकानाच्या मागील बाजूला असलेल्या पडीत जागेत एका ३५ ते ४० वर्ष वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह अत्यंत सडलेल्या आणि छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नांदुरा शहरातील माळीपुरा परिसरातील रहिवासी असलेले मोहम्मद मोहसिन मोहम्मद शब्बीर (वय ४० वर्षे) यांचे स्थानिक भागात ‘उपलेटा ऑटोमोबाईल’ नावाचे दुकान आहे. बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मोहसिन नेहमीप्रमाणे आपले दुकान उघडण्यासाठी गेले होते. दुकान उघडत असताना त्यांना मागच्या बाजूने प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. संशय आल्याने त्यांनी दुकानाच्या मागे असलेल्या हाजी हुसेन हाजी गणी यांच्या पडीत जागेत जाऊन पाहिले असता, त्यांना तिथे एका पुरुषाचे प्रेत जमिनीवर पडलेले दिसले. हा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असून त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मृतकाच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट आणि काळी जीन्स पॅन्ट आहे. मृतदेहाच्या उजव्या पायात काळ्या रंगाची प्लास्टिकची चप्पल असून दुसरी चप्पल बाजूलाच पडलेली आढळली.
धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेह अनेक दिवसांपासून तिथे पडून असावा, असा अंदाज आहे. मृतकाचा उजवा हात, मान, चेहरा आणि डोके या भागाचे कुत्र्यांनी लचके तोडलेले आहेत. तसेच त्याच्या उजव्या बाजूची पॅन्ट फाटलेल्या स्थितीत आढळून आली. मृतदेह पूर्णतः कुजल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती.
मोहम्मद मोहसिन यांनी तातडीने या घटनेची माहिती नांदुरा पोलीस स्टेशनला दिली. माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी मोहम्मद मोहसिन मोहम्मद शब्बीर यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम १९४ भान्या सुसं अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.
हा मृतदेह कोणाचा आहे? संबंधित व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक आहे की हा घातपाताचा प्रकार आहे? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलीस आता बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी करत आहेत. या वर्णनाच्या व्यक्तीबद्दल (वय ३५-४०, काळा शर्ट, काळी जीन्स) काही माहिती असल्यास किंवा कोणी बेपत्ता असल्यास, त्यांनी तातडीने नांदुरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!