डोणगाव,(प्रतिनिधी)
गोठ्यात दडून बसलेल्या नर-मादी बिबट्याने शेतकऱ्याला पाहताच दोन पिले तोंडात धरून धूम ठोकली. धावताना शेतकऱ्यास धडक बसली. तीनपैकी एका महिन्याचे पिलू हरविल्याने वनविभागाने शोधमोहीम सुरू केली आहे. मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर शिवारात ३१ डिसेंबरच्या सकाळी ही घटना घडली. दरम्यान, पिलाच्या शोधात नर-मादी बिबट्याने कुणावरही हल्ला करू नये, याची दहशत पसरली असून, परिसरातील शेतकरी, शेतमजुरांनी काम सोडून घर गाठले.
मेहकर तालुक्यातील घाटबोरी वनपरिक्षेत्रामधील कळमेश्वर येथे ३१ डिसेंबरच्या सकाळी शेतकरी राजेश खुरद हे शेतामध्ये गेले होते. भाऊ सुभाष यांच्या गोठ्यातून कुऱ्हाड आणण्यास गेले. गोठ्यात पाय ठेवत नाही तोच बिथरलेल्या नर व मादी बिबटने पिलांना तोंडात घेऊन हळदीच्या शेतात धूम ठोकली. समोर बिबटे दिसताच शेतकरीही भांबावून गेला. एका बिबट्याची शेतकऱ्याला धडक बसली. या धक्क्यातून सावरल्यानंतर समोर त्यांना बिबट्याचे पिलू आढळले. याबाबत भाऊ सुभाष खुरद यांना माहिती दिली. वनविभागालाही कळविण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले व सहकारी रेस्क्यू टीमसह पोहोचले. त्या पिलास ताब्यात घेऊन त्याच्या नर-मादी बिबटचा शोध सुरू करण्यात आला आहे. पिलाची आई मिळेपर्यंत ते वनविभागाच्या निगराणीत पशु वैद्यकीय डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये ठेवण्यात आले आहे.
पिलामुळेच वाचला जीव
बिबट्याच्या धडकेवरच निभावले, जर त्यांच्या तोंडामध्ये पिलू नसते तर हल्ला करून दोन्ही बिबटने मला जीवाने मारले असते, अशी प्रतिक्रिया थरथरतच राजेश खुरद यांनी व्यक्त केली. ‘हसू आणि अश्रू’ अशी अवस्था शेतकऱ्याची झाली होती.
आईच्या भेटीसाठी पिलास ठेवले शेतात
बिबट्याचे पिलू एका महिन्याचे आहे. पशुचिकित्सकांनी केलेल्या तपासणीत ते ठणठणीत आहे. पिलू आणि त्याच्या माता-पित्याची भेट घडवून आणण्यासाठी त्याच शेतामध्ये पिलास निगराणीमध्ये ठेवले जाणार आहे. पिलाच्या विरहात फिरणारी बिबट येऊन त्यास घेऊन जाईल, अशी व्यवस्था वनविभागाने केली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री ही अंमलबजावणी केल्या जाणार आहे. शेतकऱ्यांनी एकट्या-दुकट्याने शेतात जाऊ नये. शेतात जाताना घुंगरू असलेली काठी सोबत न्यावी. समूहाने राहावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले यांनी केले आहे.
घारबलेले शेतकरी, मजूर पळाले घरी
या घटनेची माहिती समजल्यानंतर शेतकरी, शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. गहू हरभरा, हळद पिकाला पाणी देणारे शेतकरी, तूर सोंगणी व कापूस वेचणीला आलेले मजूर हातातील कामे सोडून घराकडे पळाले. बिबट्यांचा मुक्तसंचार पाहता महावितरणने दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी सरपंच विद्या सुभाष खुरद यांनी केली आहे.