जालना,(प्रतिनिधी): जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रुई परिसरात एका ४५ वर्षीय पित्याची त्याच्याच पोटच्या मुलाने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण जालना जिल्हा हादरला असून, तीर्थपुरी पोलिसांनी केवळ दोन तासांच्या आत तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी मुलासह त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.
रुई (ता.अंबड) येथील दिलीप धुराजी राजगुरु (वय ४५ वर्षे) हे नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. ८ एप्रिलच्या रात्रीपासून ९ एप्रिल २०२६ च्या पहाटे ६.३० वाजेच्या दरम्यान संपूर्ण गाव निद्राधीन असताना काळ बनून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. झोपेत असतानाच दिलीप राजगुरु यांच्या तोंडावर आणि छातीवर धारदार शस्त्राने एकामागून एक सपासप वार केले. वार इतके भीषण होते की, दिलीप यांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर घराच्या गच्चीवर पडलेला रक्ताचा सडा पाहून गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. एका साध्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीची अशी निर्घृण हत्या कोणी आणि का केली असावी? या प्रश्नाने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.
पोलिसांची ‘सुपरफास्ट’ कारवाई
घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सपोनि वैशाली पवार आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृताचे भाऊ प्रल्हाद धुराजी राजगुरु यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिताचे कलम १०३ (१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. सपोनि वैशाली पवार, भगवान शिंदे, नारायण माळी, अमर पोहार, अनिल मुसळे, विजय पवार, महेश तोटे, बाळासाहेब मंडलीक, विलास गाडेकर, गणेश मोरे, विठ्ठल वैराळ, स्थानिक गुन्हे शाखेचे देविदास भोजने, लक्ष्मण आडेप आणि सतिष श्रीवास यांनी घटनास्थळावरील परिस्थिती आणि कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता, पोलिसांच्या तपासाची सुई मृताचा मुलगा विशाल दिलीप राजगुरुवयाच्याकडे वळली. पोलिसांनी विशालला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याचा ताठरपणा गळून पडला. अवघ्या दोन तासांत विशालने आपला गुन्हा कबूल केला. त्याने आपल्या एका विधीसंघर्षित (अल्पवयीन) मित्राच्या मदतीने पित्याचा काटा काढल्याचे मान्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक जानवी बी. शेखर या करत आहेत.
कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राजगुरु कुटुंबात अंतर्गत कलह सुरू होता. किरकोळ वादातून सुरू झालेली ठिणगी हत्येच्या ज्वालापर्यंत पोहोचली. वडिलांचा कडक स्वभाव किंवा इतर काही घरगुती कारणांमुळे विशालच्या मनात पित्याबद्दल टोकाचा द्वेष निर्माण झाला होता. याच रागातून त्याने वडिलांच्या हत्येचा कट रचला आणि मध्यरात्री आपल्या साथीदारासह वडिलांचा गेम केला. रक्ताच्या नात्यानेच घेतलेल्या या रक्ताचा बदला आता कायद्याच्या चौकटीत घेतला जाईल, मात्र रुई गावावर या घटनेने कायमची शोककळा पसरली आहे.