देऊळगाव राजा,(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलश दर्शनाचा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यात ३ ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पवित्र अस्थिकलश दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सिंदखेडराजा येथील विश्रामगृह येथे आज २ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात नियोजन बैठक पार पडली. याप्रसंगी अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भगवान सातपुते, शिवसेना विधानसभा प्रमुख शिवप्रसाद ठाकरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अतिश तायडे, शिंदे शिवसेना नगरपरिषद गटनेते ॲड. संदीप मेहेत्रे, शरद पवार राष्ट्रवादी नगर परिषद गटनेते दिलीप आढाव, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अशोक मेहेत्रे, भाजप नगरसेवक संतोष मेहत्रे, अजित पवार राष्ट्रवादी शहर अध्यक्ष वैभव मीनासे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील माँसाहेब जिजाऊ जन्मस्थळ परिसरातून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर लोणार, मेहकर, खामगाव, शेगाव, वरवट बकाल, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर, मोताळा, बुलढाणा, चिखली व देऊळगाव राजा अशा विविध ठिकाणी अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनानुसार, सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मस्थान समोर, लोणार येथे विनायक कापड केंद्र चौक, मेहकर येथे अशोक हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका, खामगाव येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ, शेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात (मुक्काम), वरवट बकाल (ता. संग्रामपूर) येथे कॉटन मार्केट, जळगाव जामोद येथे दुर्गा चौक, नांदुरा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, मलकापूर येथे हनुमान चौक, मोताळा येथे मोताळा फाटा (मुक्काम, बुलढाणा), बुलढाणा येथे गांधी भवन, चिखली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका, तर देऊळगाव राजा येथे बस स्टँड चौकात भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता संत चोखामेळा सागर (खडकपूर्णा) जलाशय येथे पवित्र अस्थिकलशाचे विधीवत अस्थिविसर्जन करण्यात येणार आहे.
या श्रद्धापूर्ण व भावनिक कार्यक्रमास सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव तसेच समाजातील विविध घटक व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आ. मनोज कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, नगराध्यक्ष सौरभ तायडे, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हासह संपर्कप्रमुख छगनराव मेहेत्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विष्णू मेहत्रे, शरद पवार राष्ट्रवादीचे नेते विजय तायडे यांनी केले आहे.
आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.