अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात बेपत्ता होण्याच्या दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत मोताळा तालुक्यातील गुगळी येथील १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता झाली आहे, तर दुसऱ्या घटनेत मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील एक विवाहिता घरातून निघून गेल्यावर परतलीच नाही. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस कसून तपास करत आहेत.
पहिली घटना: ‘बस चुकली’ असा मेसेज अन् तरुणी गायब
धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुगळी (ता. मोताळा) येथील जयश्री ऊर्फ पूजा पांडुरंग सपाटे (वय १८ वर्षे) ही तरुणी १० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ‘कॉलेजला जाते’ असे सांगून घरातून निघाली होती. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तिने मामाच्या मोबाईलवर ‘माझी बस चुकली असून मी रात्री ८ वाजेच्या बसने येते’ असा मेसेज केला. मात्र, ती घरी परतलीच नाही.
तिच्या कॉलेजमध्ये चौकशी केली असता ती त्या दिवशी कॉलेजला आलीच नसल्याचे समजले. नातेवाईक आणि मैत्रिणींकडे शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर तिचे मामा राजेंद्र अर्जुन बावस्कर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिचा रंग गोरा, उंची ५ फूट २ इंच, सडपातळ बांधा. अंगात पांढरा शर्ट आणि निळी पॅन्ट घातलेली आहे. या प्रकरणी मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण करीत आहेत.
दुसरी घटना: डोणगाव येथील विवाहिता बेपत्ता
दुसरी घटना मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे घडली आहे. येथील सीमा रवी वऱ्हाडे (वय २६ वर्षे) या १० एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घरातून बाहेर गेल्या होत्या, त्या अद्याप परतल्या नाहीत. त्यांचे पती रवी शंकर वऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सीमा यांनी घराबाहेर पडताना काही कारणास्तव जात असल्याचे सांगितले होते, मात्र बराच वेळ होऊनही त्या न परतल्याने सर्वत्र शोध घेण्यात आला. अखेर ११ एप्रिल रोजी डोणगाव पोलीस ठाण्यात त्यांची मिसींग नोंदवण्यात आली आहे. त्यांच्या रंग गोरा, उंची ५ फूट, सडपातळ बांधा, केस काळे व लांब. अंगात पिवळ्या रंगाची साडी आणि हिरवट रंगाचा ब्लाउज घातलेला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार संजय घिके हे करीत आहेत.