बुलढाणा,(प्रतिनिधी): राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पोलीस दलाचे आधुनिकीकरण करण्यात बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने इतिहास रचला आहे. गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्पाच्या राज्यस्तरीय मानांकनात बुलढाणा जिल्ह्याने सलग दुसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावत अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. या यशाचे मुख्य शिल्पकार म्हणून जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक तथा सीसीटीएनएस नोडल अधिकारी अमोल गायकवाड यांच्या नावाचा डंका सध्या संपूर्ण पोलीस वर्तुळात वाजत आहे.

आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी केवळ लाठी आणि बंदुकीचीच नव्हे, तर संगणकीय कौशल्याचीही तितकीच गरज आहे. हे ओळखून बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या थेट देखरेखीखाली जिल्ह्यातील ३४ पोलीस स्टेशन पूर्णपणे संगणकीकृत करण्यात आले आहेत. केवळ संगणकीकरण करून न थांबता, प्रत्येक गुन्ह्याची नोंद, माहितीचे वहन, फॉरेन्सिक डेटा, आणि ‘क्राय-मॅक’ सारख्या प्रणालींचा प्रभावी वापर करण्यात बुलढाणा पोलीस दलाने बाजी मारली आहे.
अमोल गायकवाड: यशाचे ‘नोडल’ मार्गदर्शक
कोणत्याही मोठ्या यशामागे एक अभ्यासू आणि तितकाच कठोर परिश्रम घेणारा नेता असतो. बुलढाणा जिल्ह्यासाठी हे नेतृत्व अमोल गायकवाड यांनी दिले आहे. सीसीटीएनएस प्रणालीचे ‘नोडल अधिकारी’ म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून त्यांनी प्रत्येक बारकाव्यावर लक्ष केंद्रित केले. जानेवारी २०२६ च्या मूल्यमापनात जिल्ह्याने २१० पैकी २१० असे पैकीच्या पैकी गुण मिळवून १०० टक्के अचूकता सिद्ध केली आहे. केवळ एकदाच नव्हे, तर डिसेंबर २०२५ पाठोपाठ जानेवारी २०२६ मध्येही जिल्ह्याने प्रथम क्रमांक कायम राखून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा अव्वल पाच क्रमांकांमध्ये राहिला आहे, जे गायकवाड यांच्या दीर्घकालीन नियोजनाचे प्रतीक आहे.
टीमवर्क आणि आधुनिक प्रशासनाचा मिलाफ
अमोल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेत जिल्ह्याचे दुसरे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणीक लोढा यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच, सीसीटीएनएस प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस अंमलदार सुनील वाघमारे, किरण चिंचोले, महिला पोलीस अंमलदार दिपमाला पुरंदरे, कविता पाडळे, प्रतिभा इंगळे, नगमा शेख, पोलीस अंमलदार संतोष कायंदे, महिला पोलीस अंमलदार दिपाली खर्चे, मनिषा चोरघडे यांसारख्या अनेक ‘हँडहोल्डर’ आणि अंमलदारांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशन प्रभारींच्या समन्वयामुळेच जिल्हा आघाडीवर राहिला आहे.
बुलढाणेकरांसाठी अभिमानास्पद बाब
एकीकडे गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान असताना, दुसरीकडे प्रशासकीय कामात पारदर्शकता आणून ‘स्मार्ट पोलीसिंग’चा आदर्श अमोल गायकवाड यांनी घालून दिला आहे. त्यांच्या या कार्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता ऑनलाईन सेवांचा लाभ मिळणे अधिक सुलभ झाले आहे. राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) यांच्याकडून जाहीर होणाऱ्या या मानांकनात सातत्याने प्रथम राहणे ही बुलढाणा जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवास्पद बाब असून, अमोल गायकवाड यांच्या या यशस्वी ‘इनिंग’चे सर्वत्र कौतुक होत आहे. बुलढाणा पोलीस दलाचे हे यश म्हणजे ‘टेक्नॉलॉजी प्लस टीमवर्क’चे उत्तम उदाहरण असून, भविष्यातही हे दल राज्याला दिशा देणारे ठरेल, यात शंका नाही!
कर्मचाऱ्याच्या कष्टाचे प्रतीक
हे यश केवळ आकड्यांचे नसून ते प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याच्या कष्टाचे आणि तंत्रज्ञानाप्रती असलेल्या निष्ठेचे फळ आहे. आम्ही पारदर्शक आणि गतिमान पोलीस प्रशासनासाठी कटिबद्ध आहोत, अशी प्रतिक्रिया नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या आणि पोलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी दिली.