बुलढाणा: मोठ्या देवीच्या वहन यात्रेत भक्तांचा महासागर; नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड व गटनेते मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते महाआरती

बुलढाणा,(प्रतिनिधी):बुलढाणा शहराचे आराध्य दैवत असलेल्या जुनागाव परिसरातील मोठ्या देवीची भव्यदिव्य वहन यात्रा यंदाही पारंपरिक उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण बुलढाणा शहर ‘जय भवानी, जय जगदंबा’च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते. यावेळी नगरपालिका गटनेते मृत्युंजय गायकवाड आणि नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांच्या हस्ते देवीची विधिवत महाआरती करण्यात आली.

यात्रेच्या परंपरेनुसार, आदल्या दिवशी जुनागाव येथील श्री हनुमान मंदिरातून जगदंबा देवीची मूर्ती मोठ्या देवीच्या मंदिरात भेटीसाठी नेण्यात आली. या दोन मातांच्या भेटीचा सोहळा भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला. यात्रेच्या मुख्य दिवशी मिल्ट्री प्लॉट परिसरातील संतोषी माता मंदिरातून देवीचा भव्य रथ ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या देवीच्या भेटीसाठी रवाना झाला. यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या १२ गाड्या ओढण्याची प्रथा भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पार पाडली. नवस पूर्ण करण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी जुनागाव परिसरात गर्दी केली होती. ढोल-ताशांचा गजर, आकर्षक सजावट आणि पारंपरिक वेशभूषेमुळे यात्रेला एक वेगळेच वैभव प्राप्त झाले होते.

आमदार संजय गायकवाड यांच्या अनुपस्थितीत युवा नेतृत्वाचा पुढाकार

दरवर्षी या यात्रेची महाआरती आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या हस्ते होते, मात्र मुंबई येथील शासकीय कामानिमित्त ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत नगरपालिका गटनेते मृत्युंजय गायकवाड आणि नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांच्या हस्ते देवीची विधिवत महाआरती करण्यात आली. मृत्युंजय गायकवाड यांनी मिरवणुकीत स्वतः ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करत तरुणांमध्ये उत्साह भरला. तर महाआरतीनंतर पूजाताई गायकवाड यांनी स्वहस्ते भाविकांना प्रसादाचे वाटप केले. आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या सोहळ्याला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भास्करराव मोरे, शहर प्रमुख आशिष जाधव, संतोषराव वाकडे, दीपक तुपकर, श्रीकांत गायकवाड, नगरसेवक बबलू मावतवाल, नयनप्रकाश शर्मा यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासकीय नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे यंदाची वहन यात्रा सुरक्षित आणि यशस्वीरीत्या संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!