अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : राजूर घाटातील देवीच्या मंदिराच्या परिसरात एका ३५ वर्षीय महिलेचा गळफास घेतलेल्या स्थितीत कुजलेला मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतक महिला गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता होती. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये ‘मर्ग’ दाखल करण्यात आला असून पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करत आहेत.
बरफगाव (ता.नांदुरा) येथील रहिवासी असलेल्या मंगला शांताराम तायडे (वय ३५ वर्षे) यांचे पती दोन वर्षांपूर्वी वारल्यामुळे त्या आपल्या मुलासह माहेरी (जयपूर कोथळी, ता. मोताळा) राहत होत्या. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी त्या आजारपणामुळे दवाखान्यात उपचार घेण्यासाठी मोताळा येथे गेल्या होत्या. तिथून त्या शेगावला जाणार असल्याचे त्यांनी आपल्या आईला सांगितले होते. मात्र, त्या घरी परतल्याच नाहीत. दरम्यान, ८ मार्च २०२६ रोजी सकाळी राजूर घाटातील देवीच्या मंदिराच्या बाजूला एका महिलेचा मृतदेह झाडाला ओढणीने लटकलेल्या स्थितीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. १० दिवस उलटून गेल्यामुळे मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मोहन उकर्डा सुरडकर (वय ५६ वर्षे) रा. जयपूर कोथळी यांना संपर्क साधून बोलावून घेतले. त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली असता, तो मृतदेह त्यांची पुतणी मंगला तायडे हिचाच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांत मोहन सुरडकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुषमा पाटील ह्या करत आहेत. मंगला यांनी आत्महत्या का केली? त्या मोताळा येथून राजूर घाटात कशा पोहोचल्या? याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत. १० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा असा दुर्दैवी अंत झाल्याने जयपूर कोथळी आणि बरफगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.