बुलढाण्यात कौटुंबिक वादातून तलवारहल्ला

अजय टप
मलकापूर,( प्रतिनिधी) : जुन्या वादातून एका ६० वर्षीय वृद्धावर आणि त्यांच्या पत्नीवर आरोपींनी तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा शहरातील इंदिरानगर भागात घडली. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांत तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाणा शहरातील इंदिरानगर परिसरात राहणारे नजमोद दीन खाँ मोले खाँ (वय ६० वर्षे)  हे २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आपल्या घरी जेवण करत होते. त्यावेळी आरोपी सलमान खाँ याने त्यांना फोन करून मशिदीसमोरील चौकात बोलावले. नजमोद दीन खाँ तिथे पोहोचले असता, आरोपी इब्राहिम खाँ याने त्यांचे हात पकडले, तर कादर खाँ याने त्यांची गच्ची धरली. याचवेळी संतापलेल्या सलमान खाँ याने आपल्या हातातील तलवारीने नजमोद दीन खाँ यांच्या पाठीवर सपासप वार केले. हा वाद सुरू असताना पतीला वाचवण्यासाठी नजमोद दीन खाँ यांची पत्नी शमिना बी मध्यस्थी करायला आल्या. मात्र, आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला चढवला. या झटापटीत शमिना बी यांच्या दोन्ही हातांच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी नजमोद दीन खाँ मोले खाँ यांनी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी इब्राहिम खाँ मौले खाँ, कादर खाँ इब्राहिम खाँ आणि सलमान खाँ इब्राहिम खाँ (सर्व रा. इंदिरानगर, बुलढाणा) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम कलम ११८ (१), ११५ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार प्रकाश बाजड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!