अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : महिला व तरुण बेपत्ता होण्याचे सत्र सुरू असताना, जिल्ह्यातून गेल्या २४ तासांत मुली बेपत्ता होण्याच्या नवीन तीन घटना समोर आल्या. यामध्ये एका अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याचा देखील प्रकार समोर आला. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून या प्रकरणी चिखली, जलंब आणि जळगाव जामोद पोलिसांत मिसिंग आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेपर द्यायला गेलेल्या विद्यार्थिनीचे अपहरण
चिखली : देऊळगाव माळी (ता. मेहकर) येथील प्रल्हाद दिगंबर भराड यांची १७ वर्ष ८ महिने वयाची मुलगी रेवती भराड ही सध्या चिखली येथील शिवाजी कॉलेजमध्ये बारावीची परीक्षा देण्यासाठी गेली होती. मात्र, रेवती पेपर द्यायला पोहोचलीच नसल्याचे समजताच तिच्या वडिलांनी कॉलेज गाठले. कॉलेजमध्ये तिचा शोध घेतला असता, ती मिळून आली नाही. त्यामुळे आपल्या मुलीला अज्ञात इसमाने लग्नाचे किंवा अन्य आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची तक्रार त्यांनी चिखली पोलिसांत दिली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार सूर्यकला म्हस्के ह्या करीत आहेत.
भास्तन येथून १९ वर्षीय तरुणी बेपत्ता
जलंब: जलंब पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या भास्तन (ता.शेगाव) येथील गौरी भागवत मिरगे (वय १९ वर्षे) ही तरुणी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरात कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. तिचा भाऊ कार्तिक मिरगे याने गावातील मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र, तिचा पत्ता लागला नाही. गौरीची उंची ५ फूट, रंग सावळा, चेहरा गोल, बांधा सडपातळ. अंगात पंजाबी ड्रेस आणि पायात काळ्या रंगाची चप्पल घातलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मिसिंग दाखल केली असून उपरोक्त वर्णनाच्या मुलीबाबत काही माहिती मिळाल्यास जलंब पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी पोलीस अंमलदार राजेश हिवाळे यांनी केले आहे.
बाथरुमला गेली अन् गायब झाली
जळगाव जामोद : आसलगाव (ता. जळगाव जामोद) येथील देविदास शंकर मसुरकार यांची २१ वर्षीय मुलगी रोहिणी मसुरकार ही १५ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास बाथरुमला जात आहे, असे आपल्या लहान बहिणीला सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी रात्रभर तिचा शोध घेतला. परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. रोहिणीची उंची १६३ सें.मी., रंग गोरा, चेहरा गोल, काळे लांब केस. अंगात पिवळ्या रंगाचा टॉप आणि कथिया रंगाची सलवार-ओढणी आहे. तिच्या मानेवर उजव्या बाजूला तिळ आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार उमेश शेगोकार हे करीत आहेत.