बोगस बियाण्यांमुळे टरबूज पिकाचे मोठे नुकसान

खामगाव,(प्रतिनिधी): खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळाल्याने टरबूज पिकाचे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात संबंधित शेतकऱ्यांनी सुमारे ५ ते ६ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

शिर्ला नेमाने येथील शेतकरी किरण प्रताप चव्हाण, अनिकेत नेमाने आणि अक्षय नेमाने यांनी देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथील गणेश कृषी केंद्रातून सागर बायो प्रा. लि. कंपनीचे टरबूज बियाणे खरेदी केले होते. शेतकऱ्यांनी ‘सागर किंग प्लस’ हे वाण मागितले असताना कृषी केंद्राकडून त्यांच्या कर्मचाऱ्यामार्फत ‘सागर एक्सपर्ट’ हे वाण चांगले उत्पादन देईल, असे सांगून देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी बियाणे खरेदी करून १० डिसेंबर रोजी सुमारे १० पाकिटांची पेरणी केली. पेरणीनंतर ९० दिवस पूर्ण होऊनही टरबूज फळांची वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नाही. सध्या फळांचे वजन केवळ २०० ग्रॅम ते १ किलोपर्यंतच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. साधारणत: ८५ दिवसांत टरबूजाचे वजन ५ ते ६ किलोपर्यंत वाढणे अपेक्षित असते.त्याच कंपनीचे ‘सागर किंग प्लस’ हे वाण इतर शेतकऱ्यांनी लावले असून त्यांच्या शेतातील टरबूजांचे वजन ५ ते ६ किलोपर्यंत झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. संबंधित शेतकऱ्यांनी ०.८० हेक्टर क्षेत्रात टरबूज लागवड केली होती. या शेतीवर आतापर्यंत सुमारे अडीच लाख रुपये खर्च झाला असून सुमारे ३५ टन उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र बोगस बियाण्यांमुळे संपूर्ण खर्च वाया गेला असून अंदाजे ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून आमच्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी किरण चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान, तालुका कृषी अधिकारी सुनील पवार, गुण नियंत्रण अधिकारी अमोल बंड आणि दत्तात्रय काळे यांनी शेतात भेट देऊन २ मार्च रोजी शास्त्रज्ञांच्या टीमसह स्थळ पंचनामा करण्यात आला. त्या वेळी कंपनीचे कर्मचारी उपस्थित नसल्याने ४ मार्च रोजी कंपनीच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन पाहणी करण्यात आली. झालेल्या नुकसानीचा अहवाल पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!