बुलढाणा,(प्रतिनिधी): प्रशासकीय वर्तुळालात बुलढाणा जिल्हा म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून ओळखल्या जाते. म्हणूनच एकदा का एखादा अधिकारी जिल्ह्यात बदलून आला,की तो काही केल्या लवकर खुर्ची सोडत नाही. असाच काहीसा प्रत्यय येथील जिल्हा माहिती अधिकाऱ्याबाबत आला. प्रशासकीय बदल्यांचे आदेश होऊनही पदाचा मोह न सुटल्याने “खुर्चीला चिटकून” बसलेल्या येथील प्रभारी जिल्हा माहिती अधिकाऱ्याविविरुद्ध अखेर प्रशासनाने ठोस पावले उचलली. “हिंदवार्ता” वृत्तसमूहाने यासंदर्भात चालवलेल्या धडक वृत्तमालिकेची दखल घेत प्रशासनाने अवघ्या ४८ तासांत चक्रे फिरवली आणि पवन राठोड यांना कार्यमुक्त करून त्यांच्या जागी नवीन जिल्हा माहिती अधिकारी काजी यांना रुजू करून घेतले आहे.
बुलढाणा प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांची काही महिन्यांपूर्वी यवतमाळ येथे बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नियुक्तीही झाली होती. मात्र, नवीन अधिकारी अद्याप रुजू झाले नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करत पवन राठोड यांनी आपला मुक्काम बुलढाणा कार्यालयातच ठोकला होता. शासकीय आदेशाचा अवमान करत त्यांनी आपली खुर्ची टिकवून धरल्याची चर्चा होती. यामुळे जिल्हा माहिती कार्यालयातील कामकाजावर आणि शिस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
दरम्यान, “हिंदवार्ता”ने या गंभीर प्रकरणाकडे तसेच त्यांच्या बेजबाबदार आणि हलगर्जीपणाकडे माहिती प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रशासकीय नियमांची पायमल्ली करणाऱ्या आणि कर्तव्यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध सलग वृत्तमालिका प्रसिद्ध केली. (नव्हेतर वृत्तमालिका सुरू आहे). या वृत्तामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून वृत्ताची तीव्रता लक्षात घेऊन वरिष्ठ स्तरावरून हालचालींना चांगलाच वेग आला. या बाबीची गांभीर्याने दखल घेत, प्रशासनाने अवघ्या ४८ तासांत पवन राठोड यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर नवीन जिल्हा माहिती अधिकारी काजी यांनी तात्काळ बुलढाणा कार्यालयाचा पदभार स्वीकारला आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या “खुर्ची नाट्यावर” पडदा पडला आहे, हे विशेष!