भाजपा पदाधिकाऱ्याकडून बेरोजगारांची फसवणुकीचा आकडा १२ लाखांवर

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी): राजकीय वरदहस्त आणि बड्या नेत्यांशी असलेले जवळचे संबंध यांचा वापर करून सुशिक्षित बेरोजगारांना लुबाडण्याचे एक मोठे रॅकेट मलकापुरात उघडकीस आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगून भाजपा पदाधिकारी अरविंद मनोहर किनगे याने सुशिक्षित तरुणांना लाखो रुपयांचा चुना लावल्याच्या तक्रारी तिघांनी दिल्या आहेत. त्यामुळे ही फसवणुकीची साखळी मोठी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात स्थानिक आमदार आणि बाजार समिती सभापती यांच्या नावाचा गैरवापर झाला असतानाही त्यांची ‘चुप्पी’ अनेक संशयांना जन्म देत आहे.

शहरातील चाळीस बिघा परिसरातील रहिवासी अरविंद मनोहर किनगे याने आपल्याला आमदार, खासदार आणि राजकीय पुढारी वैयक्तिक रितीने ओळखतात, अशी बतावणी केली. कृषी उत्पन्न बाजार समिती (मलकापूर) येथे नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी ४ लाखांची मागणी केली होती. या जाळ्यात अडकलेल्या तरुणांनी आपली जमापुंजी, घरातील दागदागिने विकून आणि उसनवारी करून पैसे गोळा केले. विशेष म्हणजे, हे व्यवहार पारदर्शक वाटावेत यासाठी किनगे याने फोन पे आणि आरटीजीएसद्वारे पैसे स्वीकारले. यात त्याची पत्नीही सहभागी असल्याचे तक्रारकर्त्यांनी केलेल्या तक्रारीत नमुद आहे.

आतापर्यंत समोर आलेले बळी आणि रकमेचा आकडा

गणेश विष्णू वैतकर (कुंड बुद्रूक ता.मलकापूर) यांची ३ लाख ८२ हजार ६८० रुपयांनी फसवणूक झाली आहे. व्याळा (ता.बाळापूर) येथील वैभव गजानन कात्रे यांची ४ लाख ७ हजार ६८० रुपयांनी, तर सचिन अशोक पाचपोर (धरणगाव ता.मलकापूर) यांची ४ लाख ७ हजार ६८० रुपये, असे एकुन तीन जणांची तब्बल ११ लाख ९८ हजार ४० रुपयांनी फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलीस दप्तरी आहेत.

आमदार चैनसुख संचेती आणि सभापती संजय काजळे यांच्या नावाचा वापर!

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अरविंद किनगे याने पैसे उकळताना तक्रारदारांना असे सांगितले की, ‘यातील काही पैसे मला स्थानिक आमदार चैनसुख संचेती आणि कृउबास सभापती संजय काजळे यांना द्यावे लागतील. त्यांना पैसे दिल्याशिवाय तुमचे काम होणार नाही.’,असे सांगुन स्वत:च्या स्वार्थासाठी नामवंत लोकप्रतिनिधींच्या नावाचा वापर करून तरुणांची लुबाडणूक केली जात असतानाही, या नेत्यांनी अद्याप यावर कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. भ्रष्टाचाराचा इतका मोठा आरोप होत असताना लोकप्रतिनिधींची ही शांतता नेमकी कशासाठी? असा तिखट सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

पैसे मागितल्यास काटा काढण्याची धमकी!

नोकरी तर लागली नाहीच, पण जेव्हा फसवणूक झालेल्या तरुणांनी आपले पैसे परत मागितले, तेव्हा अरविंद किनगे याचे ‘खरे रूप’ समोर आले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार किनगे यांना फोन केल्यास ‘मी कामात आहे, मला पुन्हा फोन करायचा नाही,’ असे सांगून तो टाळाटाळ करतो. ‘पोलीस आणि नेते माझ्या खिशात आहेत, तुला खोट्या केसमध्ये अडकवीन,’ अशी धमकी दिली जाते. विशेष म्हणजे, ‘माझ्या पत्नीच्या नावाने महिला आयोगाकडे तुझी तक्रार करीन किंवा सावकारीची खोटी केस टाकेन,’ अशा मानसिक दहशतीचा वापर केला जात आहे. गुंडांकडून काटा काढीन,अशी उघड धमकी देऊन तक्रारदारांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचेही तक्रारीत नमुद आहे.

सुशिक्षित बेरोजगारांचे संसार उघड्यावर!

ज्या तरुणांनी नोकरीच्या आशेने आपले घरदार गहाण ठेवले, त्यांचे संसार आता उघड्यावर आले आहेत. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही केवळ भविष्याच्या आशेने त्यांनी किनगे याच्यावर विश्वास ठेवला. मात्र, आता हा विश्वास फोल ठरला असून आत्महत्येसारखे पाऊल उचलण्याची वेळ या तरुणांवर आली आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.

पोलीस प्रशासनासमोर ‘ॲसिड टेस्ट’!

उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर यांच्याकडे या गंभीर प्रकरणाच्या तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. पुराव्यादाखल बँक ट्रान्झॅक्शनचे डिटेल्सही पोलिसांकडे आहेत. आता पोलीस प्रशासन या ‘महाठगाला’ राजकीय दबावापुढे झुकून अभय देते की, कायदेशीर बेड्या ठोकून बेरोजगारांना न्याय देते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

‘हिंदवार्ता’चा सवाल

भ्रष्टाचारात नाव आलेले असतानाही आमदार चैनसुख संचेती मौन का बाळगून आहेत?, बाजार समितीच्या पवित्र वास्तूचे नाव बदनाम करणाऱ्या अरविंद किनगेवर पक्ष कारवाई करणार का?, पोलीस प्रशासन तक्रारींचा ओघ वाढण्याची वाट पाहत आहे की, आरोपीला पळून जाण्याची संधी देत आहे?, या प्रकरणातील पीडितांची संख्या मोठी असू शकते. जर तुमचीही अशीच फसवणूक झाली असेल, तर घाबरू नका, समोर या आणि तक्रार द्या. लोकशाहीच्या या लढाईत ‘हिंदवार्ता’ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे! (ब्युरो रिपोर्ट: हिंदवार्ता न्यूज नेटवर्क,मलकापूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!