अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह शहरात ओसंडून वाहत असतानाच, मध्यरात्री मलकापूरच्या हमीद चौक परिसरात एका किरकोळ वादाने रौद्र रूप धारण केले होते. नगरपालिकेच्या हायमास्टवरील झेंडा बदलण्याच्या मुद्द्यावरून दोन गट आमनेसामने आल्याने काही काळ शहराचे वातावरण भीतीच्या छायेत होते. मात्र, पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि सामंजस्यामुळे मोठा अनर्थ टळला असून सध्या शहरात ‘शांतता’ असली तरी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
हमीद चौकातील नगरपालिका प्रशासनाच्या हायमास्टवर असलेला हिरवा झेंडा काढून त्या ठिकाणी निळा झेंडा लावण्याचा प्रयत्न काही उत्साही तरुणांकडून झाला. या कृतीला मुस्लिम समाजातील काही नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला. पाहता पाहता या वादाचे रूपांतर जोरदार घोषणाबाजीत झाले. दोन्ही बाजूंकडून जमाव जमल्याने आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेल्याने तणाव कमालीचा वाढला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पोलिसांनी जमावाला पांगवण्यास सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही समाजाच्या प्रमुखांशी तातडीने संवाद साधला. “महामानवाच्या जयंतीला गालबोट लागू देऊ नका,” असे आवाहन करत पोलिसांनी जमावाला शांत केले. मध्यरात्री उशिरापर्यंत पोलिसांनी या परिसरात गस्त घातल्याने संभाव्य संघर्ष टळला.
प्रशासनाची भूमिका आणि अफवांचे पीक
सध्या हमीद चौकासह संपूर्ण मलकापूर शहरात परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे. मात्र, सोशल मीडियाच्या युगात अशा घटनांचे चुकीचे अर्थ लावून अफवा पसरवण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर “कोणीही चिथावणीखोर पोस्ट शेअर करू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये.”, असे आव्हान पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उत्सवात ‘विघ्न’ कशासाठी?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जो संविधानिक विचार दिला, तो समता आणि बंधुभावाचा आहे. त्यांच्याच जयंतीच्या दिवशी केवळ ‘झेंडा’ कोणाचा आणि कुठे, यावरून वाद होणे ही खेदाची बाब आहे. लोकशाहीत प्रत्येक रंगाला आणि विचाराला सन्मान आहे, पण तो सन्मान कायद्याच्या चौकटीत राहूनच राखला गेला पाहिजे. हायमास्टवर कोणता झेंडा असावा, हा तांत्रिक आणि प्रशासकीय विषय असताना त्याला धार्मिक वळण लागणे हे सुजाण मलकापूरकरांसाठी चिंतेचे लक्षण आहे.