अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेल्या मलकापूर शहरात बनावट नोटांच्या काळ्या धंद्याने डोके वर काढले होते. मात्र, ‘कायद्याचे हात लांब असतात’ याची प्रचिती देत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी दुपारी थरारक कारवाई केली. बसस्थानकाजवळील गजबजलेल्या स्वराज बेकरी परिसरात पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून ९ लाख रुपयांच्या बनावट नोटांच्या साठ्यासह चार सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान गुन्हेगारांनी पोलिसांच्या अंगावर हात टाकण्याचे धाडस केले. आरोपींच्या जीवघेण्या हल्ल्यात पीएसआय अविनाश जायभाये जखमी झाले आहेत. या प्रकरणातील चार आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून एक जण पसार होण्यात यशस्वी झाला आहे.
सोशल मीडियाचा ‘मायाजाल’: १ लाखात ९ लाखांचे आमिष!
या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत अत्यंत आधुनिक आणि तितकीच भयंकर होती. हे आरोपी इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून तरुणांना आणि गरजू नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत होते. “१ लाख रुपये द्या आणि ९ लाखांच्या नोटा घेऊन जा,” अशा प्रकारच्या जाहिराती आणि बनावट नोटांचे बंडल दाखवणारे व्हिडिओ शेअर करून ही टोळी लोकांना फसवण्याचा धंदा करत होती. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागताच पोलिसांनी या रॅकेटच्या मुळाशी जाण्याचा निर्धार केला. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा आणि चातुर्याचा वापर केला. एलसीबीच्या पथकाने स्वतः ‘बनावट ग्राहक’ बनून इन्स्टाग्रामवर या टोळीशी संपर्क साधला. पैशांची सौदेबाजी झाली आणि आरोपींना मलकापूरला बोलावण्यात आले. सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास स्वराज बेकरी परिसरात आरोपी अमोल गोरे, भरत वानखेडे, अविनाश तायडे आणि चेतन पाटील हे पाच जण ९ लाखांच्या नोटांची रसद घेऊन पोहोचले. दबा धरून बसलेल्या एलसीबीच्या पथकाने त्यांना चहूबाजूंनी घेराव घातला. स्वतःला अडकलेले पाहून आरोपींनी हिंसक वळण घेतले. पकड टाळण्यासाठी त्यांनी पोलिसांशी झटापट सुरू केली. एका आरोपीने तर क्रूरतेची सीमा ओलांडत आपल्याकडील छोट्या चाकूने पीएसआय अविनाश अंबादास जायभाये यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत जायभाये यांना दुखापत झाली, तरीही त्यांनी आणि त्यांच्या टीमने प्राणाची बाजी लावून चौघांना जमिनीवर लोळवले आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, या गोंधळाचा फायदा घेत सागर तायडे नावाचा आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी पीएसआय अविनाश जायभाये यांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या नेतृत्वात मलकापूर पोलीस करत आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या १८ बंडलांची तपासणी केली असता, आरोपींनी ५०० रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये वरच्या आणि खालच्या बाजूला फक्त अस्सल नोट ठेवून आतमध्ये रद्दी ठेवल्याचे समोर आले, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपींना तीन दिवसांची कोठडी
अटक करण्यात आलेल्या या चौघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपींना ९ एप्रिल २०२६ पर्यंत, म्हणजेच तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.