अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): प्लॉटची सिमेंटची खुण कोणी तोडली, या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना देवधाबा येथे घडली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर जाणू कवळे (वय २८, रा. देवधाबा) आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी असून एकाच समाजाचे आहेत. २१ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर कवळे हे आपल्या प्लॉटची सिमेंटची खुण कोणी तोडली, हे विचारण्यासाठी शेजारी राहणाऱ्या पुरुषोत्तम निनाजी सपकाळ यांच्याकडे गेले होते. या प्रश्नावरून दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची सुरू झाली. आरोपीने “मी तुझ्या प्लॉटची खुण तोडली नाही, तुला कोणी सांगितले त्याचे नाव सांग,” असे म्हणत वादाला सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, पुरुषोत्तम सपकाळ यांची दोन्ही मुले ज्ञानेश्वर आणि अनंता यांनी फिर्यादीचे दोन्ही हात घट्ट धरून ठेवले. यावेळी आरोपी पुरुषोत्तम सपकाळ यांनी बांबूच्या काठीने फिर्यादीच्या डोक्यावर जोरदार वार करून त्यांना जखमी केले. केवळ पुरुष मंडळीच नव्हे, तर आरोपीची पत्नी सरला सपकाळ हिने देखील फिर्यादीच्या गालावर चापटी मारून अपमानित केले. यावेळी सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली आणि “पुन्हा विचारायला आला तर जिवंत सोडणार नाही,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. ज्ञानेश्वर कवळे यांनी आरडाओरड केल्यावर त्यांचे चुलत भाऊ गणेश संतोष कवळे आणि पुतण्या विजय गजानन कवळे हे तातडीने मदतीला धावून आले. त्यांनी मध्यस्थी करून वाद सोडवला आणि जखमी फिर्यादीला उपचारासाठी हलवले.
या प्रकरणी ज्ञानेश्वर जाणू कवळे यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पुरुषोत्तम निनाजी सपकाळ, ज्ञानेश्वर पुरुषोत्तम सपकाळ, अनंता पुरुषोत्तम सपकाळ आणि सरला पुरुषोत्तम सपकाळ यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड हे करीत आहेत.