मलकापूर: कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये विनयभंग

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): मलकापूर शहरातील वाढती गुन्हेगारी थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. त्यातच महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार उपस्थित होत असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. शहरातील एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये संचालकानेच विद्यार्थिनीचा विनयभाग केल्याची घटना नुकतीच समोर आली. या प्रकरणी आरोपी संचालकाविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पंतनगर परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणी माता महाकाली नगर परिसरात असलेल्या एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये एमएससीआयटीचा क्लास करते. ५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सदर तरुणी क्लासमध्ये एकटी होती. त्यावेळी क्लासमध्ये कोणीच नसल्याची संधी साधून आरोपी संचालक आरोपी कैलास (वय ४३ वर्षे) याने सदर तरुणीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावर न थांबता तरुणीच्या गळ्यात हात टाकून अश्लील कृत्य केले. हा धक्कादायक प्रकार पीडित तरुणीने तिच्या मैत्रीणला सांगितला असता, ऑगस्ट २०२५ मध्ये आरोपीने तिलाही मिठी मारून, शरीराला स्पर्श करत मानसिक त्रास दिल्याचे तिने पीडितेला सांगितले. तसेच आरोपी संचालकाने अशा प्रकारे तरुणींचा विनयभंग केल्याची बाब समोर आली.
या प्रकरणी पीडित तरुणीने मलकापूर शहर पोलीस स्टेशन गाठून दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कैलास याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७९, ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार सुनील राऊत हे करीत आहेत. लज्जास्पद आणि तितक्याच संतापजनक घटनेमुळे मलकापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नव्हेतर पोटी लेकी,आणि पाठी बहिणी असणाऱ्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपीस कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!