मलकापूर: वाघुड शिवारात महावितरणची तार चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

अजय टप

मलकापूर (प्रतिनिधी): मलकापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाघुड शिवार परिसरात महावितरणच्या दोन डीपींवरील ॲल्युमिनियमची तार आणि सिमेंटचे खांब तोडून अंदाजे ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलकापूर ग्रामीण ३ वितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता मंगेश प्रभाकर राणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही चोरी २८ मार्च २०२६ च्या मध्यरात्री १२ ते पहाटे ६ वाजेच्या सुमारास घडली. अज्ञात चोरट्यांनी वाघुड शिवारातील महावितरणच्या मालमत्तेवर डल्ला मारून डिके डीपीवरील ३ गळ्यातील ३ फेज ४ वायरची ६०० मीटर ॲल्युमिनियम तार, वानखडे डीपीवरील ७ गळ्यातील ३ फेज ४ वायरची १४०० मीटर ॲल्युमिनियम तार, तसेच ८ मीटर उंचीचे २ सिमेंटचे पोल तोडून नुकसान केले. वाघुड परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी आणि महावितरण प्रशासनात चिंतेचे वातावरण पसरले असून, चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिलीप राठोड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!