मलकापूर: सोलर प्लांटमधील लाखो रुपयांची केबल लंपास

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी) : मलकापूर तालुक्यातील दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बानगुरा शिवारातील एका नामांकित सोलर प्लांटमध्ये चोरीची मोठी घटना उघडकीस आली आहे. ‘कल्प पवार प्रायव्हेट लिमिटेड’ या सोलर प्लांटमधून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपये किमतीची कॉपर केबल चोरून नेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कुलमखेड (ता.मलकापूर) येथील रहिवासी असलेले मनोज प्रकाश पाटील (वय ३० वर्षे) हे बानगुरा शिवार येथील ‘कल्प पवार प्रायव्हेट लिमिटेड’च्या सुप्रीम ब्लॉक सोलर प्लांटमध्ये साईट ॲडमिन म्हणून कार्यरत आहेत. ६ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून ते ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान, चोरट्यांनी प्लांटच्या सुरक्षेला बगल देत आत प्रवेश केला. या कालावधीत चोरट्यांनी प्लांटमधील सुमारे ६ हजार ३०० मीटर लांबीची कॉपर केबल (किंमत १ लाख ५९ हजार १०० रुपये) शिताफीने कापून चोरून नेली. इतकेच नव्हे तर, अंदाजे ३७ हजार रुपये किमतीची २ हजार मीटर केबल कापून नुकसान देखील केले.

घटनेची माहिती मिळताच मनोज पाटील यांनी साक्षीदारांच्या मदतीने परिसराची पाहणी केली असता, त्यांना काही स्थानिक तरुणांवर संशय आला. या प्रकरणी त्यांनी मलकापूर एमआयडीसी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रुपेश सुभाष गोरले (रा.तिघरा, ता. मलकापूर), सागर महादेव पवार (रा. तिघरा, ता. मलकापूर), अमोल एकनाथ कवळे (रा. देवधाबा, ता. मलकापूर), विजय शांताराम कवडे (रा. देवधाबा, ता. मलकापूर) आणि संदीप कैलास वाघ (रा. तिघरा, ता. मलकापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ३२४ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार संदीप पवार आणि दिलीप चव्हाण हे करत आहेत.

सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या सोलर प्लांटमध्ये महागड्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक असते. अशा ठिकाणी चोरीच्या घटना वाढल्याने उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मलकापूर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना लवकर अटक करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!