अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): मलकापूर शहरातील शिवाजीनगर भागातील एक २२ वर्षीय तरुण गूढरित्या बेपत्ता झाल्याने शहरात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. राहुल महादेव जाधव, असे या तरुणाचे नाव असून, तो १ मार्च २०२६ पासून बेपत्ता आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणारा राहुल जाधव हा तरुण १ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मी कामावर जात आहे, असे घरच्यांना सांगून घरातून निघाला होता. मात्र, रात्र उलटूनही तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता, त्याची दुचाकी शिवाजीनगर येथील पुतळ्यावळ उभी असल्याचे दिसून आली. परंतु, राहुलचा कुठेही पत्ता लागला नाही. राहुलची आई कांता महादेव जाधव (वय ४० वर्षे) यांनी राहुलचा नातेवाईकांकडे आणि आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही.
याप्रकरणी कांता जाधव यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार शरद मुंडे हे करीत आहेत.