‘माझा आवाज दाबण्याचा हा सरकारी कट; आम्ही रक्त देणारे, जीव घेणारे नाही!’–बच्चू कडूंचा सरकारवर घणाघाती प्रहार; आणखी काय म्हणाले बच्चू कडू पहा बातमीतील व्हिडिओमध्ये

अमरावती,(प्रतिनिधी): सामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारे ‘प्रहार’चे नेते बच्चू कडू यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर त्यांनी अत्यंत संतप्त आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप करणे हा निव्वळ मूर्खपणा असून, हा मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा आणि माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे,” अशा शब्दांत कडू यांनी प्रशासकीय आणि राजकीय दबावाचे वाभाडे काढले आहेत.

बच्चू कडू यांनी हत्येचा कट रचल्याचा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले की, “आमच्यावर कोणाच्या तरी हत्येचा कट रचल्याचा आरोप केला जात आहे. वास्तविक, आम्ही आयुष्यभर लोकांसाठी झटलो आहोत, अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीशी आमचा कधीच संबंध आला नाही. मात्र, तरीही अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करून आम्हाला अडकवण्याचे कारस्थान रचले जात आहे.” आज पहाटे ६ वाजता एसपी आणि त्यांच्या टीमने केलेल्या कारवाईवर कडू यांनी संशय व्यक्त केला. “पहाटे साडेसात वाजता धाड पडली, त्यापूर्वीच कार्यकर्त्यांना फोन करून त्यांचे मोबाईल जमा करण्यास सांगण्यात आले. ही कोणती पद्धत आहे? तुमची फॉरेन्सिक लॅब, तुमचे एसपी आणि तुमचे अधिकारी वापरून तुम्ही कशा प्रकारचे षडयंत्र रचत आहात, हे स्पष्ट दिसत आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आमदाराच्या नातेवाईकांचा उल्लेख

या प्रकरणात एका स्थानिक आमदाराच्या पुतण्याचा संबंध जोडला जात असल्याचा दावा करत, गेल्या चार महिन्यांपासून या प्रकरणाची जुळवाजुळव सुरू होती आणि आता अचानक ही कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या शैलीत ठणकावून सांगताना कडू म्हणाले, “आम्ही रक्तदान करणारे आणि लोकांसाठी जीव देणारे लोक आहोत, कोणाचा जीव घेणारे नाही. आम्हाला मूर्ख समजू नका. देवाच्या कृपेने आम्ही वाचलो आहोत, अन्यथा या लोकांनी आम्हाला कोणत्या थराला नेऊन ठेवले असते, याची कल्पना न केलेली बरी.” बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, जनतेचा आवाज उठवत असल्यामुळेच त्यांना लक्ष्य केले जात आहे. प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून ‘प्रहार’ला संपवण्याचे जे स्वप्न काही लोक पाहत आहेत, ते कधीही पूर्ण होणार नाही. या अन्यायाविरोधात कायदेशीर आणि जनतेच्या दरबारात लढा देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ही निव्वळ हुकूमशाही आहे. एका लोकप्रतिनिधीला आणि जनसेवेचे व्रत घेतलेल्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे गुन्हेगार ठरवणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. आम्ही अशा कारस्थानांना घाबरत नाही, अशी प्रतिक्रियाही बच्चू कडू यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!