मोठी दुर्घटना: मेहकरच्या पाखरे हॉस्पिटलजवळ “डीपी”ला भीषण आग

मेहकर,(प्रतिनिधी): शहरातील एका विद्युत डीपीने अचानक पेट घेतल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली. पाखरे हॉस्पिटलसारख्या गजबजलेल्या परिसरातील ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून त्यांच्या या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पाखरे हॉस्पिटल म्हणजे मेहकर शहरातील वर्दळीचा भाग आहे. या हॉस्पिटलजवळ महावितरणचे विद्युत रोहित्र आहे. आज २ फेब्रुवारीच्या दुपारी अचानक या रोहित्रामध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन त्यातून क्षणात आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. भरवस्तीत असलेल्या आणि विशेष म्हणजे हॉस्पिटलच्या जवळच ही आग लागल्याने परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली. आगीचे स्वरूप वाढत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आग लागलेल्या ठिकाणी दोन खाजगी वाहने देखील उभी होती. हॉस्पिटल जवळच असल्यामुळे या ठिकाणी रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून पाखरे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन यंत्राचा वापर आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. नव्हेतर आगीवर नियंत्रण मिळवत मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
दरम्यान, काही नागरिकांनी महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना आणि कार्यालयाला फोन करून माहिती दिली. मात्र, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी बऱ्याच उशिरा घटनास्थळी दाखल झाले. शहरातील जुन्या झालेल्या डीपी आणि लोंबकळणाऱ्या तारांमुळे, असे अपघात नित्याचेच झाले आहेत, हे विशेष!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!