बुलढाणा,(प्रतिनिधी): मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार या अफवेमुळे महिलांनी बुलढाण्याच्या जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात धडक दिली. गेल्या दोन महिन्यापासून लाभ कशामुळे बंद झाला याच्या चौकशीसाठी महिलांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
राज्यभर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते अद्याप न मिळाल्याने मोठ्या संख्येने लाभार्थी महिला अडचणीत सापडल्या आहेत. ई-केवायसी प्रक्रियेनंतर करण्यात आलेल्या मोठ्या बदलांमुळे अनेक महिला पात्र असूनही अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. परिणामी गेल्या दोन आठवड्यांपासून त्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. या समस्येसंदर्भात अनेक महिला बुलढाणा येथील महिला व बाल विकास कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. कार्यालयात त्यांना ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या तांत्रिक चुका अथवा माहितीतील त्रुटींमुळे त्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे संतप्त व चिंताग्रस्त झालेल्या महिला पुढे आपले काय होणार आणि योजनेचा लाभ पुन्हा कसा मिळणार, असा सवाल उपस्थित करत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात साडेसहा लाखांच्या जवळपास महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र, ई-केवायसीमध्ये त्रुटी आल्याने जवळपास ३० हजार महिलांचा लाभ थांबलेला आहे. ई-केवायसीमध्ये आढळल्याच्या प्रमुख कारणामुळेच हा लाभ थांबविण्यात आल्याचे बोलल्या जात असून ही त्रुटी दुरुस्त करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी आता लाभार्थी महिलांकडून केली जात आहे.